Coronavirus: बीड (Beed) जिल्ह्यातील एका व्यक्तीला कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाली आहे. या रुग्णाचा बीड शहरासह विविध गावांतील लोकाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संपर्क आल्याचं समोर आलं आहे. बीडसह 12 गावे कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील 8 दिवस म्हणजेच 4 जून पर्यंत येथे पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेश दिले आहेत.
दरम्यान, बीडमधील कारेगावच्या रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून या रुग्णाचा बीड शहरासह आसपासच्या काही गावांतील लोकांशी संपर्क आला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण बीड शहरासह खंडाळा, चऱ्हाटा, पालवण, इट, पाटोदा, वैजाळा, डोंगरकिन्ही, वडवणी, देवडी, गेवराई खांडवी, मादळमोही, धारवंटा, खरमाटा, धारुर, पारगांव या गांवामध्ये 8 दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (हेही वाचा - Coronavirus in Maharashtra: मुंबई, ठाणे, पुणे या शहरांसह राज्यातील इतर जिल्ह्यात कोविड-19 चे किती रुग्ण? जाणून घ्या कोरोना बाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी एका क्लिकवर)
#बीड शहर व काही ग्रामीण भागातील गावात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून ०८ दिवसांसाठी ४ जुन २०२० रोजी रात्री १२.०० वा पर्यंत संपूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
सविस्तर वृत्त-https://t.co/0x1lDByxJa@CollectorBeed @MahaDGIPR pic.twitter.com/Fs9VyWgt49
— District Information Office, Beed (@InfoBeed) May 28, 2020
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, 4 जून रात्री 12 वाजेपर्यंत संबंधित गावातील नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. परंतु, या भागात वैद्यकीय सेवा 24 तास सुरू राहणार आहेत. आठ दिवसांच्या कालावधीत अत्यावश्यक सेवांची शासकीय कार्यालये वगळता सर्व कार्यालये बंद ठेवण्यात येतील.
नागरिकांना बीड शहरात तसेच वरील गावात जाण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पास मिळणार नाहीत. परंतु, वैद्यकीय तातडीच्या कामासाठी बीड शहरातील नागरिकांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. राज्यात कोरोना विषाणुने थैमान घातले असताना बीड जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण आढळून आला नव्हता. परंतु, आता जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.