
छत्रपती शिवाजी महाराजांबददल (Chhatrapati Shivaji Maharaj) आक्षेपार्ह वक्ताव्य केल्याने मागील काही महिन्यांमध्ये अभिनेता राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर शिवभक्तांच्या रडार वर आला होता. आमदार अबु आझमींनी देखील औरंगझेबाचं उदात्तीकरण केल्याने वातावरण तापलं होतं. या सार्या प्रकाराची दखल घेत अखेर छत्रपती घराण्यांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत शिवाजी महाराजांबद्दल सातत्याने अवमानजनक वक्तव्य करणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी यासंदर्भात कायदा करावा,अशी मागणी केली होती. आता या कायद्याची घोषणा 12 एप्रिलला होणार असल्याची माहिती समोर आली आहे. उदयनराजे भोसले यांनी 12 एप्रिलला कायद्याची घोषणा झाली तर याला वेगळं महत्व प्राप्त होईल, असे म्हटलं आहे.
12 एप्रिल हा तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. या दिवसाचं औचित्य साधत रायगडावरून अमित शाह नव्या कायद्याची घोषणा करू शकतात अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. 12 एप्रिलला रायगडावर अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील असतील असे उदयनराजे म्हणाले आहे. 'हा कायदा व्हावा ही आपली आणि तमाम शिवभक्तांची मागणी होती' असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान अमित शाहांकडून आता होणार्या नव्या कायद्याच्या घोषणेकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे 3 एप्रिल 1680 दिवशी निधन झाले. हा दिवस चैत्र पौर्णिमा अर्थात हनुमान जयंतीचा होता. यंदा चैत्र पौर्णिमा 12 एप्रिल दिवशी आहे.
इतिहासातील प्रसंगाचे वर्णन करुन अकारण वाद निर्माण करण्याच्या प्रवृत्तींमुळे समाजात दुही निर्माण होते. कायदा आणि सुव्यवस्था देखिल बिघडते त्यामुळे अशा वक्तव्यांना रोखण्यासाठी आता अजामीनपात्र कायदा आणि किमान 10 वर्षाची शिक्षा असणारा कायदा असावा अशी मागणी उदयराजे भोसले यांनी पत्राद्वारे आणि अमित शाह यांना भेटून जातीने केली आहे.