गर्भवती, दुर्धर आजार असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा द्यावी; महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
Women and Child Development Minister, Yashomati Thakur (PC - Twitter)

गंभीर आजार असलेल्या 50 वर्षांहून अधिक वयाच्या शासकीय महिला अधिकारी-कर्मचारी, गर्भवती कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा धोका पाहता त्यांना घरातून काम (Work From Home) करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी महिला व बालविकासमंत्री (Women and Child Development Minister) अॅड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, यासंदर्भात राजपत्रित अधिकारी महासंघाने यशोमती ठाकूर यांना निवेदन दिले होते. त्यामुळे ठाकूर यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटलं होत की, कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊन स्वत:स तसेच बाळाला धोका पोहचू नये, यासाठी अनेक गर्भवती महिला अधिकारी, कर्मचारी आपल्या मूळ गावी गेल्या आहेत. तसेच लॉकडाऊन संदर्भातील आदेशामुळे वाहतुकीचे निर्बंध असल्यामुळे त्यांना कार्यालयात उपस्थित राहणे शक्य झालेले नाही. त्यामुळे 50 पेक्षा जास्त वय असलेल्या उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनीशी संबंधित विकार, हृदयविकार, फुप्फुस व श्वसनशी संबंधित आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून मानवतेच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारनेही या गटातील शासकीय महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्यापासून सूट द्यावी, असंही यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - महाराष्ट्र सरकार मंत्री व अधिकाऱ्यांसाठी विकत घेणार 6 लक्झरी कार्स; कोरोना महामारीच्या संकटात खर्च करणार 1.37 कोटी रुपये)

याशिवाय खूपच अत्यावश्यक असेल तर त्यांना त्यांच्या घराजवळच्या कार्यालयात उपस्थित राहून काम करु देण्याच्या पर्यायावर विचार व्हावा. तसेच घरातून काम (वर्क फ्रॉम होम) करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. या मागणीवर मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.