कोरोना विषाणू (Coronavirus) साथीच्या काळात, जेव्हा दीर्घकाळापासून लॉक डाऊन चालू आहे, उद्योगधंदे बंद आहेत, अशात केंद्र व राज्य सरकार दोघांनाही आर्थिक पेचप्रसंगाचा सामना करावा लागत आहे. याच परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) चार मंत्री, प्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी अशा लोकांना सहा महागड्या कार (Luxury Cars) खरेदी करण्यास विशेष परवानगी दिली आहे. या मोटारी खरेदी करण्यासाठी सरकारी तिजोरीमधून 1.37 कोटी रुपये खर्च होणार आहेत. या गाड्या क्रीडा व शिक्षण विभागातील लोकांसाठी असणार आहेत.
या सहा कार इनोव्हा क्रिस्टा (Innova Crysta) आहेत, ज्यामध्ये सात लोक बसू शकतात. प्रत्येक कारची किंमत सुमारे 22.83 लाख रुपये आहे. या गाड्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, त्यांचे सचिव (एमओएस) बच्चू कडू, क्रीडामंत्री सुनील केदार, त्यांच्या सचिव आदिती तटकरे तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वापरतील, तर 6 वी कार विभागाच्या कार्यालयीन वापरासाठी असेल. हिंदुस्तान टाईम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, शनिवारी या गाड्या खरेदीला परवानगी देणारा शासकीय प्रस्ताव देण्यात आला. (हेही वाचा: महाराष्ट्रात गेल्या 24 तासात पोलीस दलातील आणखी 237 कर्मचाऱ्यांची COVID19 ची चाचणी पॉझिटिव्ह)
अहवालानुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या खरेदीसाठी खास परवानगी दिली आहे. मात्र सचिव आणि कार्यालयाच्या वापरासाठी वाहन खरेदीसाठी अपवादात्मक परिस्थितीत मंजुरी देणे हे चुकीचे असल्याचे मत विरोधी पक्ष भाजपने व्यक्त केले आहे. याआधी मदत व पुनर्वसन प्रभारी कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले होते की, सरकारी कर्मचार्यांच्या पगारासाठी राज्याला कर्ज घ्यावे लागेल. राज्याची परिस्थिती अशी आहे की, 3-4 विभाग वगळता इतर विभागात खर्चात कपात करण्यात आली आहे मात्र आता सरकारने 6 लक्झरी कार घेण्यास परवानगी दिली आहे.