मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक (Photo Credit : Twitter)

सध्याच्या कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट काळात केंद्र सरकारने संपूर्ण देशात 21 दिवसांसाठी लॉक डाऊन (Lockdown) जाहीर केले आहे. या काळात फक्त अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक गोष्टीच सुरु राहणार आहेत. या दरम्यान नागरिकांना कोणत्याही गैरसोयीचा सामना करावा लागू नये, यासाठी राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना 24 तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Balasaheb Thackeray) यांनी याबाबत घोषणा केली. याआधी अशी दुकाने दिवसातून काही तासच उघडी राहतील अशी चर्चा सुरु होती.

कोरोना उपयाययोजना संदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वर्षा येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बंदिस्त वातावरण टाळून आणि अधिकाऱ्यांच्या बैठक व्यवस्थेत योग्य अंतर ठेवून ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना 24 तास उघडे ठेवण्याची परवानगी दिली. लॉक डाऊनमुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे, त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य खरेदी करता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. (हेही वाचा: लॉकडाऊनच्या काळात बेघर व गरजूंसाठी सुरु होणार ‘कम्युनिटी लंगर’ व ‘कम्युनिटी किचन’ योजना; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा)

मात्र ही दुकाने उघडी ठेवताना, संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता या बाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळणे बंधनकारक असणार आहे. दरम्यान, लॉक डाऊनच्या निर्णयामुळे ज्या लोकांचे हातावर पोट आहे तसेच बेघर नागरिकांसाठी, नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी (Nagpur Collector) प्रायव्हेट कंपनीच्या सहकार्याने, ‘कम्युनिटी लंगर’ (Community Langar) असा उपक्रम सुरू केला आहे. त्याचप्रमाणे, विविध प्रायव्हेट कंपनीच्या आणि स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने, इतर शहरांसाठी ‘कम्युनिटी किचन & रेडी टू इट/रेडी टू कूक’ खाद्य सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.