सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) तावडीत सापडले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून भारतात 21 दिवसांसाठी लॉक डाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आले आहे. या काळात कामाशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई आहे. मात्र या निर्णयामुळे ज्या लोकांचे हातावर पोट आहे अशा लोकांसमोर मोठी समस्या उभी राहिली आहे. याच्यावर तोडगा म्हणून आता, नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी (Nagpur Collector) प्रायव्हेट कंपनीच्या सहकार्याने बेघर नागरिकांसाठी, ‘कम्युनिटी लंगर’ (Community Langar) असा उपक्रम सुरू केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली. लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे गरजू नागरिकांना अन्न पुरवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, विविध प्रायव्हेट कंपनीच्या आणि स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने, इतर शहरांसाठी ‘कम्युनिटी किचन & रेडी टू इट/रेडी टू कूक’ खाद्य सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली. अशाप्रकारे राज्यातील विविध शहरांमध्ये बेघर आणि गरजू लोकांना पुढील काही दिवस तग धरून राहणे शक्य होणार आहे.
अजित पवार ट्वीट -
Nagpur Collector in collaboration with Pvt Co.’s has started ‘Community Langar’ for homeless citizens. Likewise, in association with various Pvt Co.’s & NGO’s, decision has been taken to start ‘Community Kitchen & Ready to Eat/Ready to Cook’ food facilities for other cities.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 26, 2020
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये ‘कम्युनिटी लंगर’सह शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, शेती वापराचे ट्रॅक्टर, हार्वेस्ट्रर आदी वाहनांना पुरेसे पेट्रोल, डिझेल उपलब्ध करुन देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. तसेच ‘लॉकडाऊन’मुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या ट्रकचालकांना इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी, ट्रकवाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील मालवाहू ट्रकवाहतूक पुन्हा सुरु होणार आहे. (हेही वाचा: लॉक डाऊनच्या काळात 5 रुपयांत घरपोच जेवण व 25 टक्के सवलतीच्या दरात मिळणार औषधे; चंद्रकांत पाटील यांची घोषणा)
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले. यामध्ये विमा, धन्य, पीएफ अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. तसेच पुण्यातील कोथरूड येथे आ. चंद्रकांत पाटील यांनी 5 रुपयात घरपोच पोळी भाजी पुरवण्याची घोषणा केली आहे. या शिवाय, डॉक्टरांनी नियमितपणे घ्यायला सांगितलेली औषधेही 25 टक्के सवलतीच्या दरात गरजूंना पोहोचवली जाणार आहेत.