Ajit Pawar's Warning to The NCP Party Workers: अजित पवार (Ajit Pawar) हे नेहमीच आपल्या खुमासदार शैलीसाठी ओळखले जातात. त्यातून ते जर पुणे, बारामती, मुळशी अशा भागात असतील तर त्यांचे भाषण काहीसे अधिकच खुलते. अजित पवार यांच्या अशाच एका ताज्या भाषणाची जोरदार चर्चा रंगली आहे. अजित पवार यांनी जाहीर भाषणात आपल्या कार्यकर्त्यांना (NCP Party Workers) तंबी दिली. ते केवळ तंबीच देऊन थांबले नाहीत तर, 'काय लावलाय फाजिलपणा. लोकांची कामं करा.... त्यासाठी पदं दिलेली आहेत. नाहीतर एकेकाच्या कानाखाली लावून पदं काढून घेईन. मला टोकाची कारवाई करायला लावू नका', असे म्हणत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट शब्दांमध्ये इशारा दिला.
पुणे येथील आठ लोकसभा मतदारसंघांच्या आढावा बैठकीत अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलत होते. अजित पवार या वेळी म्हणाले. आपला जिल्हा 13 तालुक्यांचा आहे. त्यामुळे पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमाला प्रत्येक तालुक्यातून किमान 10 वाहनं आली पाहिजेत. मुळशीकरांकडे अधिक पदं आहेत. ती पदं लोकांची कामं करण्यासाठी आहेत. वागताना निट वागा. तुमच्या चुकीच्या वर्तनामुळे तुमची नाही आमची इज्जत जाते. पवार साहेबांची इज्जत जाते, असेही अजित पवार म्हणाले. (हेही वाचा, Sanjay Raut on Spitting: 'धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेले बरे', संजय राऊत यांचा अजित पवार यांना टोला)
अजित पवार यांच्या इशाऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सुनील चांदोरे आणि बाबा कंधारे यांच्यातील वादाची किनार होती. दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते. पण दोघांमध्ये जोरदार संघर्ष. चांदोरे हे पुणे जिल्हा बँकेचे संचालक. तर कंधारे हे पंचायत समितीचे माजी सभापती. एका पदाधिकाऱ्याच्या लग्नात दोघांमध्ये चांगलीच जुंपली. त्यातून बाबा कंधारेंनी सुनील चांदेरे यांच्या कानाखाली लगावली होती. हाच धागा पकडत अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. या बैठकीत अजित पवार यांचे वक्तव्य आल्यानंतर कंधारे आणि चांदेरे या दोघांनी बैठकीच्या ठिकाणाहून काढता पाय घेतला. अजित पवार यांच्या विधानाची जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा रंगली आहे.