Sanjay Raut, Ajit Pawar | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज (3 जून) पुन्हा एकदा आक्रमक पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे आमदार संजय शिरसाट आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव घेऊन प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता संजय राऊत थुंकल्याचा आरोप केला जातो आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले. मात्र, अजित पवार (Ajit Pawar) यांनी सर्वांनी जबाबदारीने वागावे असा सल्ला दिल्याबद्दल विचारले असता संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केला. 'धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेलं बरं' असं म्हणत राऊत यांनी अजित पवार यांना जोरदार टोला लगावला. इतकेच नव्हे तर अजित पवार यांच्याबद्दल संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या संतापही व्यक्त केला.

संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेत म्हटले की, शिंदे गटातील लोक बेईमान आहेत. त्यामुळे लोकच त्यांना जोडे मारत आहेत. लोक निवडणुकीची वाट पाहात आहेत, असे सांगतानाच माझ्या जिभेला दात लागतो. त्यामुळे मला थुंकण्यासारखी कृती करावी लागते. मात्र, या बिंडोक लोकांना असे वाटते की, लोक आपल्यावरच थुंकत आहेत. त्यांना स्वप्नातही वाटते की, लोक आपल्याला जोडे मारत आहेत. जर थुंकण्यावरुनच माफी मागायची असेल तर देशातील 130 कोटी जनतेलाच माफी मागावी लागेल. कारण, लोक दररोज कोणे ना कोठे थुंकत असतात, असेही संजय राऊत म्हणाले. (हेही वाचा, Assembly-Lok Sabha Elections 2023: 'येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार'- Ajit Pawar)

दरम्यान, अजित पवार यांनी सर्वांनी जबाबदारीचे भान ठेऊन वागावे आणि बोलावे, असा सल्ला दिला असल्याचे प्रसारमाध्यमांनी राऊत यांना सांगितले. यावर संजय राऊत यांनी धारधार प्रतिक्रिया व्यक्त केली. 'धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेलं बरं' असं म्हणत 'ज्याचं जळतं त्यालाच कळतं', असं संजये राऊत म्हणाले. आम्ही काय भोगतो आहोत हे आमचं आम्हाला माहिती. आम्ही सर्व प्रकारचा त्रास सहन करुनही मूळ शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ आहोत. आम्हालाही अनेक प्रलोभणं, दबाव आले. त्रास दिला गेला. पण आम्ही मागे हटलो नाही. आम्ही कधीही भाजपशी सलगी करायला गेलो नाही. आमच्या मनात तो विचारही येत नाही, अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी अजित पवार यांना टोला लगावला.