राष्ट्रवादीत जुंपली? अजित पवार 'त्या' वेळी ज्युनिअर, त्यांच्या राजीनाम्यामुळे 'ईडी' प्रकरणात पक्षावर असलेला फोकस बदलला: छगन भुजबळ
Chhagan Bhujbal, Ajit Pawar | (Photo credit: Archived, edited, representative images)

Maharashtra Assembly Elections 2019: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) यांना अटक करण्यात आली तेव्हा, अजित पवार (Ajit Pawar) हे अगदीच ज्युनिअर होते. अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) प्रकरणात अजित पवार यांनी राजीनामा द्यायला नको होता. ईडी (ED) प्रकरणात अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बजूने तयार झालेला फोकसच बदलून गेला, असा घनाघात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला आहे. या दोन नेत्यांची परस्परविरोधी वक्तव्ये आल्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार विरुद्ध छगन भुजबळ असा संघर्ष सुरु असल्याचे चित्र प्रसारमाध्यमातून उमटताना दिसत आहे. अजित पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेवरुन केलेल्या वक्तव्यानंतर प्रसारमाध्यमांत चर्चा झाली. या चर्चेनंतर छगन भुजबळ यांनी आता अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

अजित पवार त्या वेळी ज्युनिअर नेते

प्रसारमाध्यमं अनेक वेळा अडचणीचे प्रश्न विचारतात. आम्हालाही विचारतात. परंतू, अशा वेळी काळजीपूर्वक उत्तरे द्यायची असतात. बाळासाहेबांची अटक या प्रकरणात अजित पवार यांनी आम्ही त्या वेळी ज्युनिअर नेते होते. त्यामुळे याबाबत आपण भुजबळ यांनाच विचारा. ते उत्तर देऊ शकतील, असं सांगितलं असतं तर बरं झालं असतं, असं छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

अजित पवार यांनी फोकस बदलला

दरम्यान, ईडी प्रकरणात शरद पवार यांनी ईडी कार्यालयात जाण्याच्या भूमकेवरुन सर्व फोकोस शरद पवार यांच्यावर केंद्रीत झाला होता. मात्र, अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर सर्व फोकसच बदलला. निवडणुकीच्या तोंडावर अत्यंत महत्त्वाचा असा हा फोकस होता. त्यामुळे अजित पवार यांनी राजीनामा देण्याची अजिबात आवश्यकता नव्हती. जर त्यांना राजीनामा द्यायचा होता तर त्यांनी दोन दिवस आगोदर किंवा 'त्या' दिवसाच्या दोन दिवसांनंतर द्यायला हवा होता. ते भावनिक आहेत वैगेरे, हे सर्वजरी मान्य केले तरी, त्यांनी मुळात राजीनामाच देण्याची आवश्यकता नव्हती. आणि जर राजीनामा द्यायचाच होता. तर, दोन दिवस भावना नियंत्रीत ठेवणे गरजेचे होते, असे छंगन भुजबळ यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Maharashtra Assembly Elections 2019: ... म्हणून बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली: छगन भुजबळ)

काय म्हणाले होते अजित पवार?

अजित पवार यांनी एबीपी माझा या वृत्तवाहीनीच्या एका कार्यक्रमात बोलताना बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेबाबत विधान करताना अजित पवार यांनी म्हटले होते की, 'बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणे हा निर्णय तेव्हाही आम्हाला पटला नव्हता. तो चूक आहे असे वाटत होते. परंतू, तेव्हा आम्ही निर्णयप्रक्रियेत नव्हतो. आम्ही तेव्हा अगदीच छोटे नेते होतो. त्यामुळे आम्ही जेव्हा विचारले तेव्हा, आम्ही या विभागाचे प्रमुख आहोत. त्यामुळे आम्हाला योग्य वाटेल तो निर्णय आम्ही घेणार असे सांगण्यात आले होते.', असे अजित पवार यांनी कोणाचेही नाव न घेता म्हटले होते.

दरम्यान, बाळासाहेबांच्या अटकेबाबतच्या वक्तव्यावरुन सुरु झालेला हा संघर्ष नवा वाटत असला तरी, त्याला जुन्या वादाची किनार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मराठा विरुद्ध ओबीसी असा जुनाच वाद असल्याची जोरदार चर्चा आहे. अजित पवार विरुद्ध छगन भुजबळ यांच्यातील परस्परविरोधी वक्तव्यांना या संघर्षाचीच किनार असल्याचे बोलले जात आहे.