Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Reasons for Ajit Pawar Faction Displeasure: राज्यसरकारमध्ये घटक पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर धुसफूस असल्याची चर्चा नेहमीच असते. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नाराजी अधिक असल्याचे बोलले जाते. खास करुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात ही नाराजी अधिक मोठ्या प्रमाणावर उठून दिसली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तातडीने दिल्लीला गेले आणि लगेच दुसऱ्या दिवशी राज्यातील विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री जाही झाले. पण, तरीही ही नाराजी फारशी दूर झाल्याचे दिसत नाही. आता तर बातम्या येऊ लागल्या आहेत की, केवळ दादाच नव्हे तर त्यांचा संपूर्ण गटच नाराज असल्याचे समजते. त्यांच्या नाराजीची काही ठळक कारणेही प्रसारमाध्यमांतून पुढे आली आहेत.

तो वादग्रस्त जीआर

राज्याच्या इतिहासात बहुदा प्रथमच असे घडले आहे की, अर्थमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाची फाईल गृहमंत्र्यांच्या नजरेखालून जाणार आहे. राज्य सरकारने तसा जीआर काढला आहे. या जीआरवरुनच अजित पवार अधिक नाराज असल्याचे समजते.

दादा गटातील मंत्रिही नाराज

अजित पवार गटातील मंत्र्यांमध्ये नाराजी आहे की, राज्य सरकारमध्ये निर्णय घेताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांना डावलले जाते. त्यामुळे मंत्रीपदे केवळ नावालाच आहेत का? जर निर्णय प्रक्रियेतच डावलले जात असले तर मग पदाचा तरी उपयोग काय? असा प्रश्न काही मंत्र्यांकडून उपस्थित केला जातो आहे.

लोकसभा आढावा बैठकही नाराजीचे कारण

अलिकडेच सत्ताधारी पक्षांची लोकसभा आढावा बैठक पार पडली. या बैठकीतही केवळ शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपचेच मंत्री आणि नेते दिसले. अजित पवार गटाला याची कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती, अशीही दादा गटातील काही नेत्यांची नाराजी आहे.

पालकमंत्री पद कळीचा मुद्दा

राज्यातील विविध जिल्ह्यांची पालकमंत्री पदे जाहीर झाली. पण, तीन कळीच्या जिल्ह्यांवरुन मात्र सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद कायम आहेत. ते तीन जिल्हे म्हणजे, रायगड, सातारा आणि नाशिक. या तिनही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दावा सांगितला होता. मात्र, त्याला हिरवा कंदील मिळू शकला नाही. परिणामी, दादा गटात मोठी नाराजी आहे. रायगडचे पालकमंत्री पद हे खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरे यांना तर नाशिकचे पालकमंत्रीपद ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांना हवे होते. मात्र, पक्षातील पहिल्या फळीच्या नेत्यांना द्यायचेच पालकमंत्री पद मिळाले नाही तर पुणे वगळता बाकिच्यांचे करायचे काय? असाही सवाल उपस्थित केला जातो आहे.

भाजपमधील नेत्यांकडून होणारी टीकाही पवार गटातील नेत्यांच्या नाराजीचे कारण आहे. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस (अजीतपवार गट) कोणीही काही ही उघडपणे बोलले नसले तरी, या ना त्या कारणातून नाराजी मात्र व्यक्त केली जाते आहे.