Ajit Pawar Quashes Rumours About Joining BJP: मुंबई दौऱ्यात अमित शहांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या अफवांना अजित पवारांनी दिला पूर्णविराम; म्हणाले,..
Ajit Pawar | (Photo Credit - ANI)

Ajit Pawar Quashes Rumours About Joining BJP: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची गुप्त भेट घेतली अशी चर्चा सुरू होती. त्यानंतर अजित पवार यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश करण्यासंदर्भातील अफवा फेटाळून लावल्या. भाजपमध्ये सामील होण्यासाठी पवारांनी अमित शहा यांची मुंबई दौऱ्यात भेट घेतल्याची अटकळ यापूर्वी काही माध्यमांनी केली होती.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात गुप्त बैठक झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. अजित पवार यांनी आता या अफवांना प्रत्युत्तर देत त्या खोट्या असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, अमित शहा मुंबईत आल्यापासून त्यांच्या हालचाली मीडियाने बारकाईने फॉलो केल्या होत्या. मी त्यांच्याशी कोणतीही गुप्त भेट घेतली नाही. (हेही वाचा -सरकारचा मुंबईवर राग का? कांजुर कारशेडवरुन आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीकेची झोड)

अजित पवार यांनी म्हटलं आहे की, भेट कुठं झाली आणि केव्हा झाली? मुंबईत अमित शहा उतरल्यापासून सगळे चॅनल त्यांच्या पाठिमागे होते. तेथून ते विनोद तावडेंच्या घरी निघाले आणि नंतर ते सह्याद्रीला गेले. मी कालच नागपुरात येणार होतो. पण सभा संध्याकाळी असल्याने मी अनिल देशमुखांशी बोलून आज सकाळी नागपूरला आलो आहे. भेटीगाठीच्या गोष्टी लपवून केल्या तरी त्या लपून राहत नसतात. अमित शहा यांच्यासोबत भेटल्याच्या बातम्या खोट्या आहेत, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे.

दरम्यान, आज नागपुरात होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वज्रमूठ या नावाने ओळखली जाणारी ही बैठक राज्यभरात होणाऱ्या सहा ते सात बैठकांच्या मालिकेतील दुसरी बैठक आहे. या सभेला प्रत्येक पक्षातील दोन मान्यवर संबोधित करतील, असा निर्णय महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी घेतला आहे. नागपुरातील आजच्या बैठकीत स्थानिक नेते म्हणून अनिल देशमुख आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलणार आहेत, तर काँग्रेसतर्फे नाना पटोले आणि सुनील केदार बोलणार आहेत. शिवसेनेचे वक्ते अद्याप ठरलेले नाहीत.