दिल्लीप्रमाणेच मुंबईमध्ये (Mumbai) कडाक्याच्या थंडीसह (Cold) प्रदूषणानातही वाढ झाली आहे. रविवारी मुंबई शहरात तसेच उपनगरात कडाक्याची थंडी जाणवली. मुंबई शहरातील बोरीवली, मालाड, बीकेसी, वरळी, चेंबूर, माझगाव आणि नवी मुंबई येथील हवेचा दर्जा खालावला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 26 ते 28 जानेवारीदरम्यान राज्यात पुन्हा थंडीचा लाट येणार आहे. आज मुंबईमध्ये 24 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर नवी मुंबईमधील उपनगरांमध्ये 23 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
राज्यात रविवारी नाशिक येथे सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली. नाशिकमध्ये 11 अंश सेल्सिअस तापमानामुळे नाशिककर गारठले आहेत. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. थंडीमुळे लोक दिवसाही स्वेटर घालताना पाहायला मिळत आहे. विदर्भात मंगळवारी (21 जानेवारी) तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. (हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर शिर्डीकरांचा बंद अखेर मागे; 19 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)
दरम्यान, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा येथे हवामान कोरडे राहील. तसेच मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मंगळवारी आकाश निरभ्र राहील. पुण्यात रविवारी पुणे शहरात 12.7, जळगाव 12.7, सातारा 14.3, उस्मानाबाद 13.4 तर औरंगाबाद शहरामध्ये 12.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.