निवडणूक जाहीरनाम्यात खोटी अश्वासने, NCP आमदार संग्राम जगताप यांच्याविरोधात न्यायालयात फिर्याद
Sangram Jagtap | (Photo Credits: Facebook)

निवडणूक आणि राजकीय नेत्यांची अश्वासने हे समिकरण फार जुने. दिलेली अश्वासने कोणी गांभीर्याने घेतही नाही आणि ती पूर्णही होत नाहीत. झालीच तर अपवाद. अश्वासनांची खैरात करणाऱ्या नेत्यांना कोणी जाबही विचारत नाही. पण अहमदनगर (Ahmednagar) येथील एका नागरिकाने हे धाडस दाखवले आहे. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे संबंधित आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्याविरोधात तक्रारही दाखल केली आहे. संग्राम जगताप (Sangram Jagtap) असे या आमदाराचे नाव आहे. निर्भय फाऊंडेशनचे संदीप अशोक भांबरकर यांनी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवर गुरुवारी (२३ सप्टेंबर) प्राथमिक सुनावणी होणार आहे.

निवडणूक जाहीरनाम्यात आमदार संग्राम जगताप यांनी आयटी पार्कसंबंधी खोटे आश्‍वासन दिल्याचे अशोक भांबरकर यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. आमदार जगताप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आयटी पार्कसंबंधी खोटे आश्वासन दिले. त्यातून नागरिकांची आणि मतदारांची फसवणूक झाली असा भांबरकर यांचा आरोप आहे. आयोजित पत्रकार परिषदेत भांबरकर यांनी ही माहिती दिली. (हेही वाचा, Sanjay Raut On Chandrakant Patil: चंद्रकांत पाटील यांची किंमत 1.25 रुपये; संजय राऊत ठोकणार अब्रूनुकसानीचा दावा)

भांबरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आमदार संग्राम जगताप यांनी विधनसभा निवडणूक 2019 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढवली. या निवडणुकीत त्यांनी मतदारांना नगरमध्ये आयटी पार्क सुरु केल्याचे म्हटले. तसेच, या आयटी पार्कमध्ये अनेक युवक-युवतींना नोकरी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय या आयटी पार्कमध्ये नोकरी मिळाल्याचे काही युवक-युवतींचे व्हिडिओही त्यांनी सादर केले. अलिकडे हा आयटी पार्क चर्चेत आला आहे. त्यामुळे आम्ही माहिती अधिकार कायद्याखाली माहिती मागवली. तेव्हा संबंधित यंत्रणांकडून संग्राम जगताप यांनी ज्या आयटी पार्कचा उल्लेख केला तो नगरमध्ये अस्तित्वातच नसल्याचे पुढे आले. ही माहिती आम्हाला एमआयडीसी कार्यालयाकडून माहिती अधिकारात मिळाली. एमआयडीसी कार्यालया उत्तरादाखल सांगितले की, 'महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सहमुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई यांचे परिपत्रक 26 ऑक्टोंबर 2016 अन्वये अहमदनगर औद्योगिक क्षेत्रामधील आयटी पार्क वगळण्यात आला आहे. या आयटी पार्कबाबतची जागा इतर उद्योगांना भाडेतत्वावर दिल्या'चेही एमआयडीसीने म्हटले आहे. एमआयडीसीचे उत्तर पाहता लक्षात येते की, आमदार जगताप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांची दिशाभूल केली.

दरम्यान, निवडणूक काळात खोटी माहिती देऊन मतदार आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या आमदार संग्राम जगताप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी त्यांनी कोतावाली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. परंतू, तिथल्या पोलिसांनी तक्रार अर्ज स्वीकारला नसल्याने आपण पोलिस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज दिला. परंतू, त्यावरही कारवाई झाली नाही. अखेर आपण मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवर गुरुवारी (२३ सप्टेंबर) प्राथमिक सुनावणी होणार आहे, असे भांबरकर यांनी म्हटले आहे.