Ahmednagar District Co-operative Bank: राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापेक्षा  बाळासाहेब थोरात यांचे पारडे जड, 'या' निवडणुकीत मारली बाजी
Radhakrishna Vikhe Patil , Balasaheb Thorat | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अहमदनगर (Ahmednagar) हा सहकाराचा जिल्हा. या जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक सहकारसंस्था आणि कारखाने आहेत. त्यामुळे सहाजिकच राजकीय मंडळी या सहकारी संस्थांवर पकड ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यावरुन त्यांच्यात नेहमीच संघर्ष असतो. अशाच संघर्षात राज्याचे महसूलमंत्री, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी बाजी मारली आहे. तर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील काहीसे पिछाडीवर गेले आहेत. निमित्त ठरले आहे अहमदनगर जिल्हा सहकारी बँक ( Ahmednagar District Co-operative Bank ) अध्यक्ष पद निवडणूक (Election 2021). या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उदय शेळके यांची अध्यक्ष तर, संगमनेर काँग्रेसचे माधवराव कानवडे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

अहमदनगर जिल्हा सरकारी बँक अध्यक्ष पद निवडणुकीत बाजी मारण्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी प्रदीर्घ काळापासून तयारी सुरु केली होती. दुसऱ्या बाजूला भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील आणि मधूकर पिचड यांनीही तयारी सुरु केली होती. मात्र, बाळासाहेब थोरात यांना रोखण्यात विखे पाटील आणि पिचड गटाला अपयश आले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रयत्न अयशस्वी ठरल्याने थोरात गटाची सरशी होऊन अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेवर महाविकासआघाडीची सत्ता आली आहे. (हेही वाचा, Ahmednagar District Co Operative Bank Election 2021: अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत पुन्हा एकदा संघर्ष; विखे-थोरात-कर्डीले-राम शिंदे गट सक्रीय)

दरम्यान, बाळासाहे थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मदतीने ही निवडणूक लढवली. त्याचा काँग्रेसला चांगला फायदाही झाला. सत्तावाटपातही फारशी संघर्षात्मक भूमिका न घेतल्याने राष्ट्रवादीचा अध्यक्ष तर काँग्रेसचा उपाध्यक्ष होऊ शकला. विशेष म्हणजे दस्तुरखुद्द भाजपच्या काही संचालकांनीही या वेळी महाविकासआघाडीला समर्थन दिले. त्यामुळे नगर जिल्ह्याच्या राजकारणात विखे पाटील, पीचड गटाची चांगलीच कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, अहमदनगर जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष पदावर निवड झालेले उदय शेळके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. शिवाय ते बाळासाहेब थोरात यांचेही नातेवाईक आहेत. त्यामुळे एनकेन प्रकारेन सत्ता आपल्यासोबत ठेवण्यात थोरात यांनी चांगलेच यश मिळवले आहे.