Ahmednagar District Co Operative Bank Election 2021:  अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत पुन्हा एकदा संघर्ष; विखे-थोरात-कर्डीले-राम शिंदे गट सक्रीय
Ahmednagar District Leader | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणूक 2021 ( Ahmednagar District Co Operative Bank Election 2021) निमित्त पुन्हा एकदा जिल्हा पातळीवरील नेते कामाला लागले आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने अहमदनगर जिल्ह्यात वर्चस्व कोणाचे? हे दाखवण्यासाठी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil), शिवाजी कर्डिले (Shankarrao Gadakh) आणि राम शिंदे (Ram Shinde) आदी नेत्यांचे गट कार्यरत झाले आहेत.

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या एकूण 21 जागांसाठी ही निवडणूक पार पडत आहे. त्यासाठी येत्या 20 फेब्रुवारीला मतदान पार पडत आहे. निवडणुकीत उमेदवारी करु इच्छिणाऱ्या सदस्यांसाठी निवडणूक अर्ज वाटपास सुरुवात झाली आहे. अर्ज वाटप सुरु झाल्यावर पहिल्याच दिवशी 23 जणांनी सुमारे 153 अर्ज घेतले आहेत. निवडणूक अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत 25 जानेवारी आहे. (हेही वाचा, राज्यातील ग्रामसभांना 31 मार्च पर्यंत स्थगिती)

राजकीय गटांमध्ये स्पर्धा

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेवर झेंडा फडकविण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या नेत्यांचे विविध गट सक्रिय झाले आहेत. हे गट खालील प्रमाणे

  • महसूलमंत्री बाळासाहेब थोरात- काँग्रेस
  • राधाकृष्ण विखे पाटील- भाजप
  • शंकरराव गडाख
  • राम शिंदे- भाजप
  • शिवाजीराव कर्डीले

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगोदरच जाहीर केले आहे की, अहमदनगर जिल्हा बँक निवडणूक शिवसेना आणि काँग्रेस पक्षालो सोबत घेऊन लढली जाईल. शिवसेना आणि काँग्रेस पक्षाने मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वक्तव्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. भाजपनेही जिल्हा सहकारी बँकेसाठी हालचाल सुरु केली आहे.

दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तगडा उमेदवार देण्यासाठी इतर पक्षातील नेत्यांना पक्षप्रवेश देऊन उमेदवारी देण्याची तयारी सुरु केल्याचे समजते. असे कोणते नेते आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन उमेदवारी मिळवतील याबाबत उत्सुकता आहे.