महाराष्ट्रामध्ये आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सचिन अहिर (Sachin Ahir) आता शिवसेनेमध्ये (Shiv Sena) प्रवेश करण्याची शक्यता असल्याच्या चर्चा रंगायला लागल्या आहेत. सध्या शिवसेनेच्या पोस्टरवर सचिन अहिरांचा फोटो असलेले एक खास पोस्टर व्हायरल होत आहे. हे पोस्टर सचिन अहिर यांच्या खाजगी सचिवाकडूनच व्हायरल केलं जात असल्याची चर्चा आहे. आज सचिन अहिर वांद्रे येथील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या निवासस्थानी म्हणजे 'मातोश्री' वर जाणार असल्याचे समजते आहे. अद्याप सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
सचिन अहिर हे मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आहेत. 2009 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादच्या सरकारमध्ये त्यांनी गृहनिर्माण खात्याचे राज्यमंत्री पद सांभाळले होते. यासोबत वाहतूक आणि पर्यावरणासोबतच संसदीय कामकाजाचाही अतिरिक्त भार देण्यात आला होता. आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये त्यांना वरळी मतदारसंघातून तिकीट मिळू शकतं. सचिन अहीर यांच्यासोबतच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. अहमदनगरचे अकोलेचे आमदार वैभव पिचड (MLA Vaibhav Pichad) यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे.वैभव पिचड हे मधुकर पिचड यांचे चिरंजीव आहेत. शरद पवार यांच्यासह ममता बॅनर्जी यांना धक्का, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, CPI चा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा धोक्यात
लोकसभा निवडणूकीदरम्यानही अनेक दिग्गज राजकारण्यांनी पक्षांतर केले होते. काही महिन्यांपूर्वी कॉंग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजपा प्रवेश झाला. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देखील देण्यात आलं आहे.अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणूकीच्या तोंडावर आता अशा अनेक मोठ्या धक्क्यांची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाबद्दलही चर्चा रंगली होती. मात्र हे वृत्त छगन भुजबळ यांनी नाकारत त्याला पूर्णविराम लावला आहे.