
फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला होळी (Holi 2025) साजरी केली जाते. यंदा पौर्णिमा तिथी 13 मार्च 2025 सकाळी 10.35 वाजेपासून दुसऱ्या दिवशी 14 मार्च 2025 ला दुपारी 12:23 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार होलिका दहन 13 मार्च 2025 ला असणार आहे. होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरा करण्यात येतो. त्यांनतर पाच दिवसांनी महाराष्ट्रात रंगपंचमीचा सण साजरा होतो. यंदा रंगपंचमी 19 मार्च 2024 ला साजरी करण्यात येणार आहे. मुंबईसारख्या शहरात होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीच्या उत्सवाची मोठी धामधूम पाहायला मिलालते. अशात आता मुंबई पोलिसांनी सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि शहरात शांतता राखण्यासाठी या उत्सवादरम्यान कडक निर्बंध जाहीर केले आहेत.
पोलीस उपायुक्त (ऑपरेशन्स) अकबर पठाण यांनी जारी केलेला हा आदेश 12 मार्च ते 18 मार्च या कालावधीत लागू असेल. यामध्ये सार्वजनिक गैरसोय किंवा कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकणाऱ्या काही क्रियाकलापांवर बंदी घालण्यात आली आहे.
होळी साजरी करण्यासाठी प्रमुख निर्बंध:
- अश्लील भाषा आणि गाण्यांवर बंदी- अश्लील शब्द, घोषणा किंवा गाणी सार्वजनिकरित्या उच्चारण्यास परवानगी दिली जाणार नाही. अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
- आक्षेपार्ह हावभाव आणि चिन्हे वापरण्यास मनाई- नागरिकांना अनुचित हावभाव वापरण्यास, आक्षेपार्ह कृतींची नक्कल करण्यास किंवा अश्लील, अनैतिक किंवा सार्वजनिक प्रतिष्ठेला आक्षेपार्ह मानल्या जाणाऱ्या चित्रे, फलक किंवा इतर वस्तू प्रदर्शित करण्यास मनाई आहे.
- पादचाऱ्यांवर रंगीत पाणी फेकणे किंवा फवारणी करणे यावर मनाई- छळ आणि गैरसोय टाळण्यासाठी, संमतीशिवाय लोकांवर रंगीत पाणी, रंग किंवा पावडर फेकणे किंवा फवारणी करणे सक्त मनाई आहे.
- पाण्याचे फुगे वापरण्यास बंदी- सणाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी साध्या किंवा रंगीत पाण्याने भरलेले फुगे तयार करणे, वाहून नेणे आणि फेकणे याला परवानगी नाही. (हेही वाचा: Holi Festival In Maharashtra: महाराष्ट्रातील होळी आणि परंपरांचे रंग)
शांततापूर्ण आणि आदरयुक्त उत्सव सुनिश्चित करण्यासाठी हे उपाय राबवले जात आहेत असे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्याच्या संबंधित कलमांखाली कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे. रहिवाशांना जबाबदारीने उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, तसेच इतरांच्या हक्कांचा आदर करावा आणि सार्वजनिक ठिकाणी शिष्टाचार राखावा, असेही पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी आश्वासन दिले आहे की, ते सार्वजनिक ठिकाणांवर बारकाईने लक्ष ठेवतील आणि कोणत्याही व्यत्ययाविरुद्ध कारवाई करतील.