Holi Festival | ( (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मराठी पंचांगानुसार फाल्गून हा महिना येतो आणि त्याच्यासोबत मराठी वर्षाची सांगता होते. फाल्गुन महिन्यास शिमगा म्हणूनही ओळखले जाते. कारण याच महिन्यात शिमगा म्हणजेच होळी येते. आदल्या दिवशी होळी आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन महाराष्ट्रात यास धुळवड असेही म्हणतात. कोकणात शिमगा सण मोठ्या स्वरुपात साजरा होतो. अनेक ठिकाणी त्यास शिमगोत्सव देखील म्हणतात. हा सण प्रामुख्याने फाल्गुन पौर्णिमा ते पंचमी असा साजरा होतो. ज्यामध्ये पारंपरीक प्रथा, परंपरांसोबत रंगांचीही उधळण होते. पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामिण भागात तर राड खेळण्याची पद्धत असते. जाणून घेऊया महाराष्ट्रातील होळीचे नानाविध रंग.

हिंदू वर्षातील शेवचा सण

हिंदू पंचागानुसार भारतात यंदा होळी सण गुरुवार दिनांक 13 मार्च 2025 रोजी येतो आहे. तर त्यालाच लागून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 14 मार्च 2025 रोजी धूलिवंदन आहे. पंचांगानुसार हिंदू वर्षातील हा शेवटचा सण असतो. तो संपला की, पुढच्या अवघ्या 15 दिवसांमध्येच म्हणजे गुढीपाडव्यापासून नवे वर्ष सुरु होते. महाराष्ट्रातही मराठी वर्ष गुढीपाडव्यापासूनच सुरु होते. दरम्यान, फाल्गुन पौर्णिमेनंतर खऱ्या अर्थाने वसंतोत्सव सुरु होतो. खस करुन उत्तर भारतात हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. या सणास होळी पोर्णिमा म्हणूनही ओळखले जाते. (हेही वाचा, Holi 2025 Date: होळी कधी आहे? होलिका दहनाचा शुभ मुहूर्त, तारीख घ्या जाणून)

विविध नावांनी परीचित

देशभरामध्ये होळी सण विविध नावांनी परिचीत आहे. ज्यामध्ये 'होलिकादहन', 'होळी', 'शिमगा', 'हुताशनी महोत्सव', 'दोलायात्रा', 'कामदहन' अशा विविध नावांचा समावेश होतो. कोकणात तर या सणास 'शिमगो' म्हणण्याची पद्धत आहे. काही लोक साहित्यीक भाषेत याला 'वसंतोत्सव' म्हणूनही ओळखतात. सर्व महाराष्ट्राच्या तुलनेत कोकणात या सणास विशेष महत्त्व असते. कोकणात हा सण तब्बल 15 दिवस सुरु असतो. अेक ठिकाणी रात्रीच्या वेळी होम केला जातो. काही ठिकाणी पोर्णिमायुक्त प्रतिपदेसही होम असतो. गावागावांमध्ये उत्साह पाहायला मिळतो. गावकरी मंडळी रात्रीच्या वेळी शिमग्याचे सोंग आणतात तर दिवसा होळी खेळातत. (वाचा - Holika Dahan 2025: होलिका दहनाच्या दिवशी चुकूनही करू नका या गोष्टी, जाणून घ्या, संपूर्ण माहिती)

पश्चिम महाराष्ट्रातील होळी

पश्चिम महाराष्ट्रात म्हणाल तर गावोगावी होळीच्या दिवशी गावकऱ्यांकडून गोवऱ्या, लाकूड-फाटा आणि कडब्याच्या पेंड्या आणून होळी रचली जाते. गावातील पुजारी होळी पेटवतात आणि गावकरी होळीच्या भोवती बोंब मारत फिरत असतात. फिरता फिरता सोबत आणलेला नैव्यद्यही होळीत टाकत असतात. होळीतील नैव्यद्य काढण्यासाठी तरुण आणि लहानमुलांची झुंबड असते. दुसऱ्या दिवशी याच होळीतील राख घेऊन धुळवड साजरी केली जाते. ज्यामध्ये राखेची राड एकमेकांवर उडवून आनंद साजरा केला जातो.

कोकणमध्ये , ग्रामदेवतेच्या मुख्य मंदिरासमोर पहिला होम लावला जातो. गावकरी या होमातील निखारा, राख घेऊन घरी जातात आणि ठिकठिकाणी होळी पेटवत असतात. गावातीर महिला घरासमोरील अंगण स्वच्छ करत असतात, अंगणात रांगोळ्या घारतात. घरासमोर पताका लावतात, फुलांची सजावट करतात, होळीची पूजा करुन होळी भोवती पारंपरिक लोकगिते गात लोकनृत्य करण्याचीही पद्धत आहे.

होळीच्या दिवशी गोडाधोडाचा नौव्यद्य असतो, ज्यामध्ये पुरण पोळी, पुरी, श्रीखंड, गुळवणी, शेख भात आणि तळणीचे पदार्थ असा बेत असतो, तर दुसऱ्या म्हणजेच धुळवडीच्या दिवशी मांसाहार केला जातो. ज्यामध्ये कोंबडी किंवा बोकडाचे मटण खाण्यास प्राधान्य दिले जाते.