आमदारकीचा राजीनामा मंजूर करण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांची वृत्तपत्रात जाहिरात
आमदारकीचा राजीनामा मंजूर करण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांची वृत्तपत्रात जाहिरात (संग्रहित,संपादित प्रतिमा)

राज्याच्या राजकारणात शनिवारी एक भलताच प्रकार पाहायला मिळाला. ज्या प्रकाराची केवळ राजकीयच नव्हे तर, राज्याच्या जनतेच्या तोंडीही चर्चा सुरु झाली आहे. औरंगाबाद येथील कन्नड विधासभा मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा (आमदारक पदाचा) राजीनामा मंजूर करण्यात यावा यासाठी चक्क वृत्तपत्रात जाहीरात दिली आहे. आमदारकीचा राजीनामा मंजूर करावा यासाठी थेट वृत्तपत्रात जाहीरात देण्याची राज्यातच नव्हे तर, देशातही बहुदा पहिलीच घटना असावी. राज्याचे मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना उद्देशून ही जाहीरात आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड विधानसभा मतदारसंघातून 2014ची निवडणूक शिवसेनेच्या तिकीटावर लढवली. त्यात त्यांनी विजयही मिळवला. मात्र, पुढे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी आपल्या आमदारकीचा (विधानसभा सदस्यत्वाचा) राजीनामा दिला. तसेच, शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन ते पक्षातून बाहेर पडले. दरम्यान, त्यांनी शिवराज्य बहुजन पक्ष नावाने स्वतंत्र राजकीय पक्ष काढल्याची घोषणाही केली. दरम्यान, लोकमत या दैनिकात शिवराज्य बहुजन पक्ष या बॅनरखाली ही जाहीरात प्रसिद्ध झाली आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी 'आपण विधानसभा अध्यक्षांकडे ई-मेलद्वारे आपला राजीनामा २५ जुलै रोजी पाठवला असल्या'चे त्या वेळी सांगितले होते. मराठा आरक्षणाचा अध्यादेश न काढल्यास आपण आमदारकीचा राजीनामा देऊ असे जाधव यांनी सरकारला सांगितले होते. दरम्यान, राजीनामा दिल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती. (हेही वाचा, शिवबंधन तुटले, आमदार हर्षवर्धन जाधवांचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र', लवकरच नव्या पक्षाची स्थापना)

हर्षवर्धन जाधव यांच्या जाहीरातीतील प्रमुख मुद्दे

  • मराठा समाज मागास असल्याची बाब कोणत्याही राजकीय पक्षाने गांभर्याने घेतली नाही.
  • मुख्यमंत्री महोदय मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला गेली ४ वर्षे आपण बगल देत आहात.
  • १डिसेंबरपर्यंत आपण मराठा समाजाला आरक्षण देणार. त्यामुळे समाजाने जल्लोष करावा असे वृत्तपत्रात वाचले. या विधानावरुन लोक किती कोडगे असतात याचा प्रत्यय आला.
  • मराठा समाजाची आवस्था पाहून मी उद्विग्न होऊन माझा विधानसभेचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला मात्र, अद्यापही तो मंजूर केला नाही.

आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दै. लोकमत वृत्तपत्रात दिलेली हीच ती जाहिरात (Photo Credit: epaperlokmat.in)

आतपर्यंतचे एकूण राजकारण पाहिले असता समाजात प्रचंड विषमता तयार झाली आहे. त्यामुळे ही विषमता दूर करण्यासाठी काय करता येईल? याबाबत मी विचार करत होतो. याच मुद्द्यावर विचार करण्यासाठी तपाडिया नाट्य मंदिर येथे एक चिंतन बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत विविध जात, समूहाच्या प्रतिनिधींनी आपले विचार व्यक्त कले. त्यानंतर पक्षस्थापनेचा निर्णय घेतला. लवकरच नव्या पक्षाची घोषणा केरुन सभासद नोंदणीस सुरु केली जाईल असे हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. आपल्या या घोषणनेनंतर अल्पावधीतच जाधव यांनी शिवराज्य बहुजन पक्ष नावाच्या राजकीय पक्षाची घोषणा केली.