
शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पक्षाला 'जय महाराष्ट्र' केला आहे. सध्या तरी इतर कोणत्याही पक्षात न जाता त्यांनी नवा पक्ष स्थापन करणार असल्याचे म्हटले आहे. मी माझ्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. शिवसेनेसोबत आता माझा काहीही संबंध राहिला नाही. त्यामुळे पक्ष माझ्यावर काय कारवाई करणार किंवा काय निर्णय घेणार हा प्रश्नच उद्भवत नाही, असे जाधव यांनी आगोदरच स्पष्ट केले आहे.
शिवसेनेला जय महाराष्ट्र आणि आमदारकीचा राजीनामा याबाबत आपली भूमिका हर्षवर्धन जाधव यांनी स्पष्ट केली आहे. आतपर्यंतचे एकूण राजकारण पाहिले असता समाजात प्रचंड विषमता तयार झाली आहे. त्यामुळे ही विषमता दूर करण्यासाठी काय करता येईल? याबाबत मी विचार करत होतो. याच मुद्द्यावर विचार करण्यासाठी तपाडिया नाट्य मंदिर येथे एक चिंतन बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत विविध जात, समूहाच्या प्रतिनिधींनी आपले विचार व्यक्त कले. त्यानंतर पक्षस्थापनेचा निर्णय घेतला. लवकरच नव्या पक्षाची घोषणा केरुन सभासद नोंदणीस सुरु केली जाईल असे हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले आहे.
दरम्यान, समाजातील सर्वच घटकांना उदा. धनगर, न्हावी, माळी, कोळी, दलित, राजपूत, ठाकूर, वंजारी, मुस्लिम आदि. त्रास होत आहे. सुरुवातीला मी मराठा समाजाच्या वतीने पक्ष स्थापन करण्याबाबत बोललो होतो. मात्र, विविध जात-समूहाच्या प्रतिनिधींशी बोलल्यावर सर्वांचेच प्रश्न थोड्याफार फरकाने सारखेच आहेत हे माझ्या ध्यानात आले. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या दृष्टीने नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला असेही हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले आहे.