Adar Poonawalla Participated In Vaccination Drive: कोविशील्ड लसची निर्मिती करणारे सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांचा लसीकरण मोहिमेत सहभाग; पहा व्हिडिओ
Adar Poonawalla Participated In Vaccination Drive (PC - Twitter)

Adar Poonawalla Participated In Vaccination Drive: आज देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेला शुभारंभ केला. सध्या सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे. आज सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेत कोविशील्ड लसीची निर्मिती करणारे सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी भाग घेतला आणि लस टोचून घेतली. अदर पुनावाला यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याप्रसंगाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये अदर पुनावाला कोवॅक्सिन लस घेताना दिसत आहेत. या व्हिडिओला कॅप्शन देताना अदर पुनावाला यांनी म्हटलं आहे की, 'भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात मोठी कोविड लसीकरण मोहिम राबवण्यात यशस्वी झाले आहेत. याचा मला अत्यंत अभिमान वाटतो. #COVISHIELD या ऐतिहासिक प्रयत्नांचा एक भाग आहे आणि या सुरक्षिततेची आणि कार्यक्षमतेची कबुली देण्यासाठी मी आमच्या आरोग्य कर्मचार्‍यांसोबत लसीकरण मोहिमेत सामील झालो.' (वाचा - Coronavirus Vaccination Process: तुम्हाला कोरोना लस घ्यायची आहे का? जाणून घ्या लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया)

दरम्यान, आज लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना लसीकरणासंदर्भातील अफवांचा बळी पडू नका, असं आवाहन केलं. एम्सच्या रुग्णालयाचे संचालक रणदीप गुलेरिया यांनीही आज लसीकरण मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन देखील उपस्थित होते.

कोरोना लसीसंदर्भात अनेक अफवा पसरत आहेत. अशा परिस्थितीत रणदीप गुलेरिया यांनी कोविड लस घेऊन सर्व शंका चुकीच्या असल्याचे सिद्ध केलं आहे. एम्समध्ये रुग्णालयामध्ये आज स्वच्छता विभागातील कर्मचारी मनीष कुमार यांना पहिली कोरोना लस देण्यात आली. कुमार हे या लसीचे पहिले मानकरी ठरले आहेत.