
शिवसेना (UBT) युवा आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना प्रतिआव्हान दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि थेट पुन्हा एकदा पोटनिवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हान सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते. या आव्हानाला प्रतिआव्हान देताना आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, होय, मी हे आव्हान स्वीकारतो. माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो. पण, त्यानंतर लागणाऱ्या निवडणुकीत माझ्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना उभे करा, असे आदित्य ठाकरे म्हणाले. यावर आता सुधीर मुनगंटीवार काय प्रतिक्रिया देतात याबाबत उत्सुकता आहे.
आदित्य ठाकरे यांनी मुंबई येथील फुटबॉल वर्कशॉपच्या उद्घाटनासाठी उपस्थिती लावली होती. या वेळी प्रसारमाध्यमांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या आव्हानाबाबत विचारले असता आदित्य यांनी पलटवार केला. सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूर येथून बोलताना म्हटले होते की, आदित्य ठाकरे आम्हाला पुन्हा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी काय सांगत आहेत. त्यांनी त्यांच्या शिल्लख आमदारांना राजीनामा द्यायला सांगायला हवे. हवे तर त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून राजीनामा द्यावा. आणि पोपट मेला आहे की, जीवंत यांची खात्री करुन घ्यावी, असे मुनगंटीवार म्हणाले. (हेही वाचा, Devendra Fadnavis On Raj Thackeray: ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, त्यांनाच त्रास होणार, देवेंद्र फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर)
सुधीर मुनगंटीवार यांच्या आव्हानाला प्रतिआव्हान देताना आदित्य ठाकरे म्हणाले, होय, तुमचे आव्हान स्वीकारण्याची माझी तयारी आहे. पण माझ्याविरोधात घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना उभे करण्याची तुमची तयारी आहे का? त्यांना माझ्या विरोधात उभे करणार असाल तर माझी राजीनामा देण्याची तयारी आहे. आताच राजीनामा देतो. चला होऊन जाऊ द्या, असे प्रतिआव्हान ठाकरे यांनी मुनगंटीवार यांना दिले. तसेच, मंत्रिमंडळामध्ये सुधीर मुनगंटीवार यांचे कोणीच ऐकत नसल्याचा चिमटाही आदित्य यांनी हळूच काढला.