Oil Tanker Overturned In Jalgaon: चार चाकी वाहनाला धडक बसण्यापासून वाचवण्याच्या प्रयत्नात भुसावळ (Bhusawal) शहरात खाद्यतेल घेऊन जाणारा टँकर उलटल्याची (Oil Tanker Overturned ) घटना घडली. या अपघाताची माहिती मिळताचं टँकरमध्ये असलेलं खाद्यतेल पळवून नेण्यासाठी स्थानिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. भुसावळ शहरातील खुशबू हॉटेलसमोर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला.
सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, तेलाचा टँकर उलटल्याची संपूर्ण परिसरात पसरली. अनेकांनी हा अपघात बघण्यासाठी गर्दी केली तर काहींनी या टँकरमधील कच्चे खाद्यतेल पळवण्यासाठी गर्दी केली. पुरुष, स्त्रिया तसेच लहान मुलांनी टँकरमधील तेल पळवण्यासाठी पातेले, ड्रम तसेच मिळेल ती वस्तू आणली. (हेही वाचा -Washim Accident News: वाशिममधल्या भीषण अपघातात सुट्टीवर आलेल्या जवानाचा मृत्यू)
प्राप्त माहितीनुसार, या टँकरमध्ये सोयाबीनचे खाद्यतेल होते. हा टँकर गुजरातमधील अंजिराकडे जात होता. राष्ट्रीय महामार्गावर एका कारला वाचवण्याच्या प्रयत्नात टँकर पलटला. हे तेल तेल रिफायनरीमध्ये जाणार होते, हे माहित असतानादेखील स्थानिकांनी तेल नेण्यासाठी घटनास्थळी गर्दी केली.
दरम्यान, या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताचं त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यादरम्यान, तेल पळवून नेण्यासाठी लोकांनी याठिकाणी प्रचंड गर्दी केली होती. पोलिसांनी नागरिकांना खडसावल्यानंतर तेथील गर्दी कमी झाली. महामार्गावरून जाणाऱ्या अनेक प्रवाशांनी या घटनेचे व्हिडिओ आपल्या मोबाईल फोनमध्ये कैद केले आहेत.