
शुक्रवारी रात्री वाशिमच्या (Washim) कारंजा-मंगरुळपीर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 24 वर्षीय जवानाचा मृत्यू झाला आहे. सुनील आडोळे असे मृत जवानाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महिन्याभराची सुट्टी घेऊन दोन दिवसांपूर्वी गावी आलेल्या या जवानाचा भरधाव ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. योगेश आडोळे हे मूळ धोत्रा गावातील रहिवाशी असून 2019 साली भारतीय सैन्यदलात (Indian Army) दाखल झाले होते. मागील चार वर्षांपासून ते जम्मू काश्मीर मधील राजुरी येथे सेवा देत होते. (हेही वाचा - Mumbai Central Railway: प्रवासांच्या सुरक्षिततेसाठी मध्यरेल्वे कडून निर्बंध; जाणून घ्या कोणत्या स्थानकांवर)
योगेश आडोळे हे शुक्रवारी रात्री नातेवाईकाच्या लग्नसमारंभावरून परतत असताना कारंजा-मंगरुळपीर महामार्गावर भरधाव वेगात आलेल्या ट्रकने योगेश यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की योगेश यांचा जागीच मृत्यू झाला.
योगेश हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्यांच्या घरची परिस्थिती जेमतेमच असून त्यांचे घर त्यांच्या पगारावरच घर चालत होते. लहान बहिणीचे लग्न झाले आहे. योगेश यांच्या अपघाती निधनाने त्यांच्या परिवारासह संपूर्ण गावावर मोठी शोककळा पसरली आहे. दरम्यान, योगेश यांच्या निधनाची वार्ता सैन्यदलाला कळवण्यात आली. यानंतर पूलगाव येथील सैन्याचे अधिकारी गावात दाखल झाले. आज त्यांच्या पार्थिवावर धोत्रा ह्या त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.