संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढत असताना गेल्या काही महिन्यांपूर्वी काळ्या बुरशीचा (Black Fungus) संसर्ग वाढू लागला. हा संसर्ग अतिशय धोकादायक असून तो रुग्णांच्या अनेक अवयवांवर परिणाम करत आहे. आतापर्यंत काळ्या बुरशीकडे कोविडनंतर उद्भवणारे लक्षण म्हणून पाहिले गेले आहे. मात्र आता पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल (YCMH) मध्ये दाखल झालेल्या 45 वर्षीय व्यक्तीस कोविड आणि म्यूकोरमायकोसिस एकाचवेळी झाल्याचे आढळून आले आहे. 29 जून रोजी या व्यक्तीची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर, 30 जून रोजी काळ्या बुरशीचे निदान झाले.
पुणे मिररने याबाबत वृत्त दिले आहे. ही घटना, दोन संक्रमण एकाचवेळी होऊ शकत नाही या विचारांना आव्हान देत आहे. आतापर्यंत काळी बुरशी हे कोविडनंतरचे लक्षण असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या रुग्णाला दोन मुले आहेत आणि त्याच्या कुटूंबाने सांगितले की यापूर्वी त्याच्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसली नव्हती. वायसीएमएच येथील ईएनटी विभागाचे प्रमुख डॉ. अनिकेत लाठी यांनी सांगितले की, त्यांच्या रुग्णालयातील ही पहिलीच घटना आहे. सध्या रुग्णाची दृष्टी कमी होऊ लागली आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, कोविड प्रकरणांमध्ये घट झाल्यानंतर आता काळ्या बुरशीची प्रकरणे वाढत आहेत. आतापर्यंत त्यांच्या रुग्णालयात 125 ब्लॅक फंगसची प्रकरणे आढळली असून, सुमारे 103 जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि 20 जणांचा मृत्यू झाला. आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या वरिष्ठ ईएनटी सल्लागार डॉ. वैशाली महेंद्र बाफना म्हणाल्या की, एकाच वेळी काळी बुरशी व कोविडच्या घटना या आधी समोर आल्या आहेत. स्टिरॉइड्सच्या वापरामुळे, कोरोनामुळे रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी होते आणि साखरेची पातळी वाढते. (हेही वाचा: COVID-19 Variant Lambda चा जगात 30 देशांमध्ये शिरकाव)
त्यांनी पुढे असेही सांगितले की, यासाठी नागरिकांनी लवकरात लवकर स्वतःचे लसीकरण करून घेणे महत्वाचे आहे. डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी रुग्णांना कोविडनंतर त्यांच्या आहारावर व्यवस्थित लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल.