Nagpur: 1300 रुपयांची दारू पडली 40 हजारांना, नागपूर येथील एका व्यक्तीची भामट्यांनी 'अशी' केली फसवणूक
Liquor | entational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देशात सायबर गुन्हेगारीच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. गुन्हेगारीचे स्वरुप सातत्याने बदलते असते. तंत्रज्ञानाचा वापर वाढला तशी या क्षेत्राशी संबंधित गुन्हेगारीतही वाढ झाली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत गुन्हेगारी वाढीस लागली. यातच ऑनलाईन दारू मागवणाऱ्या एका व्यक्तीला सायबर गुन्हेगारांनी 40 हजारांचा गंडा घातल्याची माहिती समोर येत आहे. हा प्रकार नागपूर (Nagpur) येथील इमामबाडी (Imambada) परिसरात घडला आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तीने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्यंकटेशर्ज्जू रामचंद्र मरापाका (वय, 39) यांनी 17 जुलै रोजी ऑनलाईन पद्धतीने दारू खरेदी केली. त्यासाठी त्यांनी 1300 रुपये दिले होते. मात्र, त्यानंतर एका व्यक्तीचा त्यांना फोन आला आणि बिलाची कॉपी मिळवण्यासाठी पाठवलेला क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले. मरापाका यांनी क्यूआर कोड स्कॅन करताच त्यांच्या खात्यातील 19 हजार 865 रुपये गायब झाले. यासाठी मरापाका यांनी आपले पैसे परत मिळवण्यासाठी त्या व्यक्तीला कॉल केला. मात्र, पैसे परत मिळवण्यासाठी तुम्हाला पुन्हा क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार असल्याचे त्या व्यक्तीने मरापाका यांना सांगतिले. मात्र, क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर पुन्हा मरापाका यांच्या खात्यातून आणखी 19 हजार 865 गायब झाले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे मरापाका यांच्या लक्षात येताच त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. हे देखील वाचा-Firing At Jalgaon: जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार

सायबरच्या गुन्ह्य़ातही गुन्हेगारांनी आणखी नावीन्य आणले आहे. एखादे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करायला लावून किंवा एखाद्या संकेतस्थळ ओपन करायला लावून त्या आधारे डाटा चोरी केली जाते, या मोबाईलच्या डाटामध्ये अनेकदा बँक खाते क्रमांक, पासवर्ड किंवा इतर महत्वाच्या स्वरुपाची माहिती असते. डेबीट किंवा क्रेडीट कार्डचे क्लोनिंग करुन एटीएममधून पैसे काढून चोरी केल्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत.