चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur District) चिमूर तालुक्यात (Chimur Taluka) वाघाच्या हल्ल्यात (Tiger Attack) एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राजू दडमल असं या शेतकऱ्याचं नाव आहे. चिमूर तालुक्यातील ताडोबा कोर झोन परिसरात ही घटना घडली. एका आठवड्यात वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे. तसेच गेल्या तीन महिन्यात हा पाचवा बळी आहे.
दरम्यान, राजू दडमल हे दोन दिवसांपूर्वी शेतात गेले होते, तेव्हा पासून ते बेपत्ता होते. मात्र, आज सकाळी कोलारा भागातील जंगलात त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताचं सर्वत्र खळबळ उडाली. चंद्रपूर जिल्ह्यात वाघ हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. एका आठवड्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच नागरिकांकडून वन विभागाला वाघाचा बंदोबस्त करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. (हेही वाचा - महाराष्ट्र: मंत्रालय, अन्य शासकीय कार्यालयांमध्ये 8 जून पासून 15 टक्के उपस्थिती अनिवार्य)
चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यातल्या ताडोबा कोर झोन परिसरात, वाघाने केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. #chandrapur
— AIR News Mumbai, घरीच रहा, सुरक्षित रहा (@airnews_mumbai) June 7, 2020
15 फेब्रुवारी रोजी चिमूर तालुक्यातील कोलारा गेट परिसरात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 8 एप्रिलला वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता. चिमूर तालुक्यातील सातारा गावाजवळ ही घटना घडली होती. याशिवाय 19 मे रोजी चिमूर तालुक्यातील कोलारा येथे वाघाने एका 63 वर्षीय महिलेवर हल्ला केला होता. तसेच 4 जून रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर तालुक्यातील बामनगाव शिवारातील वाघाच्या हल्ल्यात 30 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता.