सातारा (Satara) जिल्ह्यात एका 17 वर्षीय तरुणाची 25 लाखांच्या खंडणीसाठी हत्या (Murder) करण्यात आली आहे. तेजस विजय जाधव, असं या तरुणाचं नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी तेजसची हत्या करून मृतदेह विहिरीत बांधून ठेवला. ही घटना सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे नागठाणे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
नागठाणे पोलिसांनी या प्रकरणी आशिष साळुंखे आणि साहिल शिकलगार यांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस जाधव 11 डिसेंबर 2019 रोजी नागठाणे येथे व्यायामासाठी दुचाकीवरून गेला होता. परंतु, तो रात्री उशिरापर्यंत घरी परत आला नाही. त्यामुळे तेजसच्या कुटुंबियानी बोरगाव पोलीस ठाण्यात तेजस बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली. (हेही वाचा - Washroom-on-Wheels: महापालिकेच्या जुन्या भंगार बसेसचा पुनर्वापर करून पुण्यातील दांपत्याने महिलांसाठी सुरू केली 'ती टॉयलेट' बस सुविधा; पहा काय आहे खास)
दरम्यान, शुक्रवारी तेजसचा मृतदेह नागठाणे येथील एका विहिरीत आढळला. त्यानंतर पोलिस तेजसचे अपहरण करणाऱ्या दोघांची कसून चौकशी करत आहेत. तेजस बेपत्ता झाला त्यादिवशी आष्टी गावापासून जवळच त्याची दुचाकी आढळली. त्यानंतर तेजसचे वडील विजय जाधव यांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. तसेच काही दिवसांनी जाधव यांना तेजसच्या अपहरणासंदर्भात फोन आला. त्यानंतर जाधव यांनी बोरगाव पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या संपूर्ण घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.