Online Fraud Case: रायगड मध्ये 55 वर्षीय व्यक्तीची ऑनलाईन खरेदी दरम्यान 2.83 लाखांची फसवणूक
Representational Image | (Photo Credits: PTI)

तंत्रज्ञान जसं प्रगत होत आहे तसे आता ऑनलाईन फसवणूकीचे देखील प्रकार समोर येत आहेत. रायगड मध्ये एका 55 वर्षीय व्यक्तीची 2.83 लाख रूपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. ई कॉमर्स वेबसाईट वर मोबाईल खरेदी करताना त्याची फसवणूक झाली आहे. मागील महिन्यात झालेल्या या प्रकाराची आता पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. न्हावा शेवा पोलिस स्टेशन मध्ये हा प्रकार नोंदवण्यात आला आहे.

हिंदूस्तान टाईम्सच्या रिपोर्ट्सनुसार, 18,549 रूपयांचं क्रेडीट कार्ड द्वारा ऑनलाईन पेमेंट करताना ते अयशस्वी झाले. पुन्हा प्रयत्न केल्यानंतर तो यशस्वी झाला. नंतर मोबाईल फोन देखील वेळेत मिळाला. मात्र क्रेडीट कार्डचं बिल जेव्हा मिळालं तेव्हा 18,549 दोनदा कापल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. बॅंकेकडून ई कॉमर्स वेबसाईटच्या कस्टमर केअर सोबत बोलण्यास सांगितले. त्यांनी तो नंबर ऑनलाईन मिळवला. पण कॉल केल्यानंतर तो बनावट असल्याचं लक्षात आलं. नक्की वाचा: मुंबईत महिलेची Matrimonial Site वर Indian Navy Captain असल्याचं सांगत 6.25 लाखांची फसवणूक .

फसवणूक करणार्‍याने त्यांना एक अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सुचवले. त्यानंतर फसवणूक करणाऱ्याने त्याच्या बँक खात्यातून ₹2,17,783 आणि त्याच्या क्रेडिट कार्डमधून ₹63,325 ट्रान्सफर केले. ही गडबड लक्षात आल्यानंतर फसवणूक झालेल्या व्यक्तीने न्हावा शेवा पोलिस स्टेशन गाठलं आणि तेथे सारा प्रकार सांगून तक्रार नोंदवली.

आर्थिक फसवणूकीचा प्रकार समोर आल्यानंतर आयपीसी 420 अंतर्गत एफआयआर आणि आयटी अ‍ॅक्ट 66C आणि 66D अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या या प्रकरणी पोलिस तपास सुरू आहे.