Man Dies Attacked in Mumbai Local Train: रेल्वेत तरूणांची गुंडगर्दी, 4 जणांच्या टोळक्याकडून झालेल्या हल्ल्यात 55 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; लाथाबुक्यांसह चाकू, बेल्टने मारहाण (Watch Video)
Representational Image (File Photo)

Man Dies Attacked in Mumbai Local Train : मुंबईत लोकल ट्रेनमध्ये तरुणांकडून झालेल्या मारहाणीत एका 55वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. 4 तरूणांच्या टोळक्याने  55वर्षीय वृद्धाला धावत्या ट्रेनमध्ये लाथाबुक्यांनी, बेल्टने मारहाण(Mumbai Local Train Attack) केली. त्याशिवाय शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. दत्तात्रय भोईर असे त्या वृद्धाचे नाव आहे. शहापूर तालुक्यातील साजिवली गावातील ते रहिवासी होते. व्यवसायाने ते शेतकरी होते. 28 एप्रिल रोजी भोईर हे त्यांचा मित्र प्रदीप शिरोसे आणि इतर दोघांसोबत एका मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. तेथून माघारी घरी परतत असताना ही घटना घडली.

प्रवाशांमधीलच एकाने माराहाणीचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. या घटनेवेळी भोईर यांच्या मित्रांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत तरूणांना बाजूला करत अत्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरूण त्या वृद्धाला मारहाण आणि आर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत होते. भोईर आणि त्यांचे मित्र आपली विनोद करत आपल्यावर हसत असल्याच्या गैरसमजातून आरोपीने भोईर यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या हल्ल्यात भोईर यांचा एक मित्रही किरकोळ जखमी झाला आहे. कसाऱ्याला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये ही घटना घडली.

“आम्ही चौघेही मित्र एकमेकांची चेष्टा करत होतो, जोरात हसत होतो. त्यावेळी दरवाजाजवळ उभ्या असलेल्या चौघांपैकी एक जण चिडला. तो आमच्याकडे आला, त्याने चाकू काढला आणि हल्ला केला. भोईर यांनी त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने माझ्या पोटातही दुखापत केली. नंतर हल्लेखोराच्या साथीदारानींही बेल्टने आमच्यावर हल्ला केला,” असे शिरोसे (भोईर यांच्या मित्र)यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

त्यानंतर 2.30 वाजता ट्रेन वासिंद स्थानकावर आली तेव्हा दोघे हल्लेखोर खाली उतरले आणि त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण, शिरोसे यांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर स्टेशनवरील पोलिसांनी दोघांना पकडले. अमोल परदेशी (40) आणि तनजी कुमार जम्मुवाल (21) अशी आरोपींची नावे आहेत. जखमी भोईर यांना प्रथम वासिंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना आसनगाव येथील क्रिस्टल रुग्णालयात व नंतर ठाण्यातील अन्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सर्व आरोपींना भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 324, 337आणि 34अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.