आज आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात (Maharashtra) 778 नवे कोरोना व्हायरसचे (Coronavirus) रुग्ण आढळले आहेत, तर 14 जणांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे राज्यात कोरोना बाधितांचा आकडा 6427 वर पोहचला आहे. सध्या राज्यामध्ये मुंबई (Mumbai) येथे सर्वात जास्त कोरोनाचे संक्रमित रुग्ण आहेत. बीएमसीने (BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज कोरोना व्हायरसचे 478 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर शहरातील रुग्णांची एकूण संख्या 4,232 झाली आहे व मृतांचा आकडा 168 वर पोहचला आहे.
पीटीआय ट्विट -
478 new coronavirus patients found in Mumbai, taking tally of cases in city to 4,232; death toll rises to 168 with eight deaths: BMC
— Press Trust of India (@PTI_News) April 23, 2020
मुंबई महानगरपालिकेनुसार, आज एकूण भर्ती झालेले संशयीत रुग्ण 278 आहेत व एकूण बाधित रुग्ण 478 इतके आहेत. सध्याच्या घडीचे एकूण बाधित 3593 इतके आहेत. आज एकूण 48 रुग्ण बरे झाले आहेत तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधित रूग्णाच्या संपर्कात आतेते अति जोखमीचे व कमी जोखमीच्या संशयिताना 14 दिवसांसाठी घरी अलगीकरणात ठेवले आहे. असे एकून 92112 रुग्णांना घरी वेगळे ठेवले आहे.
दरम्यान कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात लॉक डाऊन चालू आहेत. राज्याची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार रेड झोनमधील तसे कन्टेंटमेंट झोनमधील नियम शिथिल करण्यात येणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहेत. मात्र सर्वसामान्य रुग्ण, डायलेसिसचे रुग्ण, हृदयविकार रुग्ण, लहान मुले-वयोवृद्धांचे आजार यावर उपचार करण्यासाठी, सर्व नर्सिंग होम्स यांनी आपले दवाखाने उघडावेत असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आवाहन केले आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रात आणखी 778 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 6427 वर पोहचला- आरोग्य विभाग)
भारतामध्ये, कोरोना व्हायरसमुळे मरण पावलेल्या लोकांची संख्या वाढून 686 झाली आहे, तर एकूण संक्रमितांची संख्या 21700 वर पोहचली आहे. आज देशात 1229 नवीन रुग्ण आणि 34 मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या देशात 16689 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व 4325 लोकांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.