पुणे: उधारीवर सिगारेट न दिल्याने टपरीचालकाची निर्घृण हत्या, आरोपींचा तपास सुरु
murder | Image only representative purpose (Photo credit: pxhere)

पुण्यात (Pune) एका टपरीचालकाला उधारीवर सिगारेट न देणे जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संतोष कदम या टपरीचालकाच्या टपरीवर आलेल्या तिघांना संतोषने उधारीवर सिगारेट देणे नाकारल्याने त्याच्यावर कोयत्याने वार करुन त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. उपचारादरम्यान संतोषचा मृत्यू झाला असून या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर(Baner) येथे संतोष कदम यांची छोटी पानटपरी आहे. रविवारी संध्याकाळी हे तीन आरोपी त्याच्या टपरीवर आले. त्यांनी संतोषकडून सिगारेट मागितली. मात्र संतोषने त्यांच्याकडे पैसे मागितले असता, त्यांनी उधारीवर सिगारेट देण्यास सांगितले. मात्र त्याने या गोष्टीस नकार दिल्याने या माथेफिरूंनी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या संतोषला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हेदेखील वाचा- पिंपरी चिंचवड: पोटच्या मुलांसमोर केली 8 महिन्याच्या गरोदर पत्नीची निर्घृण हत्या, हत्येनंतर स्वत:वर वार करुन पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फरार हल्लेखोरांची नावे कळाली असून पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेने संपुर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात असून, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.