Covid-19 Positive Prisoners Escaped: सांगलीतील क्वारंटाइन सेंटरमधून 2 कोरोनाबाधित कैदी फरार
Prisoners Representative Image (PC - Pixabay)

Covid-19 Positive Prisoners Escaped: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. केंद्र तसेच राज्य सरकारकडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, असं असताना देशातून तसेच राज्यातून अनेक विचित्र घटना समोर येत आहेत. सांगलीमध्ये (Sangli) आज पहाटेच्या सुमारास क्वारंटाइन सेंटरमधील (Quarantine Center) दोन कोरोनाबाधित कैदी फरार झाले आहेत. या घटनेमुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या कैद्यांचा शोध घेत आहेत. राज्यात यापूर्वीदेखील कोरोना पॉझिटिव्ह कैदी पळून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान, मागील आठवड्यात दोन कैद्यांना दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर या आरोपींना पोलीस कोठडीत सुनावण्यात आली होती. मात्र, या दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. परंतु, आज पहाटेच्या सुमारास या दोन कैद्यांनी सांगलीतील लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या वसतिगृहात असलेल्या कोव्हिड सेंटरमधील काचा फोडून तसेच गज तोडून पळ काढला. (हेही वाचा - Missing Woman Found: पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या महिलेचा शोध लावण्यात पोलिसांना यश)

या प्रकारानंतर पोलिसांनी शहरात नाकेबंदी केली असून या दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वीही अशा स्वरुपाच्या घटना घडल्या आगेत. या महिन्याच्या सुरुवातीलाचं पुण्यातील येरवडा कारागृहातून दोन कोरोना पॉझिटिव्ह कैदी पळून गेले होते. याशिवाय औरंगाबाद जिल्ह्यात जून महिन्यात महापालिकेच्या किलेअर्क येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आलेले हर्सूल कारागृहातील दोन कोरोना पॉझिटिव्ह कैदी खिडकीचे गज वाकवून पळून गेले होते.

राज्यात शनिवारी 20 हजाराहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. याशिवाय 23 हजार 644 करोना रुग्ण बरे होऊन घरी गेले. सध्या राज्यात 2 लाख 69 हजार 119 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, सांगली जिल्ह्यात आजअखेर 33447 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 23921 रुग्ण कोरोना मुक्त झाले. सध्या 8267 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.