'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला भेट देण्यासाठी कसे पोहचाल आणि काय आहेत तिकीट दर ?
स्टॅच्यू ऑफ युनिटी (Photo Credit- PTI)

जगातील सर्वात उंच पुतळ्याचे सरदार वल्लभभाई पटेलांच्या स्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आले. भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची 31 ऑक्टोबर 2018 रोजी 143 वी जयंती असल्याने त्याचे औचित्य साधत या स्मारकाचे अनावरण करण्यात आले. सरदार पटेल यांचे स्मारक जगातील सर्वात उंच पुतळा असून त्याची उंची 182 मीटर आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी : सरदार पटेलांचा 182 मीटर उंचीचा पुतळा तयार ; ही आहेत पुतळ्याची वैशिष्ट्ये

तेथे पोहचायचं कसं?

वडोदरा विमानतळ आणि रेल्वे स्टेशनवरुन केवाडियाला जावे लागेल. हे अंतर 89 किमी आहे. अहमदाबादवरुन जाणाऱ्या पर्यटकांना 200 किमीचा प्रवास करावा लागेल. भविष्यात सीप्लेनची सेवा सुरु करण्याचा विचारही होत आहे.

स्टॅच्यू ऑफ युनिटी

केवाडियावरुन स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाण्यासाठी साधू बेटावर जावं लागेल. हे अंतर 3.5 किमी इतके आहे. त्यानंतर पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी 320 मीटरचा पूल तयार करण्यात आला आहे.

टेंट सिटी- खास पर्यटकांसाठी

केवाडिया येथे गुजरात सरकारतर्फे टेंट सिटी उभारण्यात आली आहे. यात असलेल्या तंबूमध्ये पर्यटकांना राहता येणार आहे. याशिवाय पुतळ्यापासून 3 किमीच्या अंतरावर 52 रुम्सचं थ्री स्टार 'श्रेष्ठ भारत भवन कॉम्प्लेक्स'ही आहे. येथेही राहण्याची सोय होऊ शकते.

'स्टॅच्यू ऑफ युनिटी' पाहण्याची वेळ

आठवड्याचे सातही दिवस हा पुतळा पर्यटकांसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत खुला राहणार आहे.

सेल्फी पॉईंट

लोकांची सेल्फीची क्रेझ पाहता येथे खास सेल्फी पॉईंटही बनवण्यात आला आहे.

'स्टॅच्यू ऑफ युनिटी' पाहण्यासाठी तिकीट

स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठीचे पहिले तिकीट 380 रुपये आहे. यात बसचे भाडे 30 रुपये समाविष्ट आहे. हे तिकीटामुळे सरदार पटेलांच्या मुर्तीच्या जवळ असलेल्या दर्शन डेकवरुन ही पाहण्याची संधी मिळेल.

182 मीटर उंच मुर्तीच्या 153 मीटर उंचीवर एक गॅलरी उभारण्यात आली आहे. तिथे 200 लोक उभे राहू शकतील. तसंच तिथे जाण्यासाठी फास्ट लिफ्ट तयार करण्यात आली आहे.

याशिवाय 380 तिकीटात तुम्ही फुलांचा बगिचा, संग्रहालय, स्मारक आणि सरदार सरोवर डॅम पाहू शकाल. 3 वर्षांच्या मुलांना यासाठी तिकीट लागणार नाही.

150 रुपयांचे तिकीट

स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी दुसरे तिकीट 150 रुपयांचे आहे. यात बसचे भाडे 30 रुपये समाविष्ट आहे. 3 वर्षांच्या मुलांना यासाठी तिकीट लागणार नाही. हे तिकीट खरेदी केल्यावर तुम्हाला सरदार पटेलांच्या स्मारकाच्या छातीजवळ असलेल्या गॅलरीशिवाय बाकी सर्व काही पाहता येईल.

ऑनलाईन तिकीट

स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी तुम्ही ऑनलाईनही तिकीट बुक करु शकता. https://www.soutickets.in या संकेतस्थळावर ही सुविधा देण्यात आली आहे. नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डच्या साहाय्यानं पेमेंट करता येणार आहे. मात्र क्रेडिट कार्डनं पेमेंट केल्यास 1% जीएसटी आकारण्यात येईल.