पर्यावरणपूरक पर्यटनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘जबाबदार पर्यटन’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुंबईत पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एमटीडीसीने खासगी भागीदारी तत्वावर हॉप ऑन–हॉप ऑफ बसची सुविधा आज सुरु केली आहे. दुमजली असलेल्या या एका बसचे लोकार्पण पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले.
पर्यटन विकास महामंडळाच्या 48 व्या वर्धापन दिनी पर्यटनमंत्री लोढा यांच्या हस्ते विविध पर्यटन उपक्रमांचे उद्घाटन मंत्रालयात करण्यात आले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महामंडळाच्या चित्रफित, छायाचित्र आणि दिनदिर्शिकेचे प्रकाशन, अजिंठा लेणी आकाश निरीक्षण उपक्रम, एमटीडीसी आणि एचआर कॉलेजच्या सहकार्याने युवा पर्यटन संघ उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. युवा पर्यटन संघ हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.
मंत्री लोढा म्हणाले, मुंबई हे देश विदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. मुंबईत या पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एमटीडीसीने खासगी भागीदारी तत्वावर हो हो बसची सुविधा सुरु करण्यात आली आहे. आगामी कालावधीत 11 हॉप ऑन–हॉप ऑफ बस राज्यभरात सुरू करण्यात येणार आहेत. आज एका बसचे लोकार्पण मंत्री लोढा यांनी केले. या बसच्या आरक्षणासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. बुक माय शो या ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपनीची मदत घेतली जाणार आहे. या हॉप ऑन–हॉप ऑफ बसचे आरक्षण दर कमी असतील, अशी माहिती मंत्री लोढा यांनी यावेळी दिली.
मंत्री लोढा म्हणाले, हॉप ऑन–हॉप ऑफ बस मुंबईमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू केली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळमार्फत मुंबईतील महत्वाच्या पर्यटन स्थळी ही बस जाईल. या बसचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळमार्फत पर्यटकांना ऑनलाईन बुकिंग करता येणे शक्य होणार आहे. आगामी सहा महिन्यांच्या कालावधीत राज्यात 11 होहो बसेस पर्यटनस्थळी देण्यात येतील, अशी माहितीही पर्यटन मंत्री लोढा यांनी दिली.
मंत्री लोढा म्हणाले, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि एच आर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने युवा पर्यटन संघ स्थापन करण्यात आला आहे. या उपक्रमात पर्यटन विषयक शिक्षण घेणारे 20 विद्यार्थी आज सहभागी झाले होते. पर्यटनातील विविध संधी आणि पर्यटन स्थळांची या पर्यटन विषयक शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाशी संलग्न झाल्यामुळे फायदा होईल, असे मंत्री लोढा यांनी सांगितले.
मंत्री लोढा म्हणाले, आगामी कालावधीत जबाबदार पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन महामंडळ उपक्रम राबवत आहे. वसुंधरेला हानी न पोहोचता पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग प्रयत्नशील आहे. (हेही वाचा: सिंधुदूर्गात मिनी ट्रेन सुरू करण्याबाबत चाचपणी; केंद्रीय मंत्री Narayan Rane यांची घोषणा)
यावेळी राज्यातील सर्वोत्कृष्ट 500 पर्यटक रिसॉर्टचे फोटो लॉन्च करण्यात आले ही छायाचित्रे उत्कृष्ट दर्जाचे आहेत. पर्यटन पॅकेजेसमध्ये या छायाचित्रांचा वापर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पर्यटनविषयक व्हिडीओ देखील यावेळी लॉन्च करण्यात आले. अनुभवात्मक पर्यटन अंतर्गत अजिंठा केव्ह व्हयू पॉईंट या प्रकल्पाचाही शुभारंभ यावेळी करण्यात आला.