Free Air Tickets: हाँगकाँगमध्ये येणाऱ्या जगभरातील 5 लाख लोकांना मिळणार मोफत विमान तिकीट, जाणून घ्या सविस्तर
Flight (Photo Credits: Pixabay)

कोरोना महामारीमुळे अनेक देशांनी परदेशी पर्यटकांना आपल्या देशात बंदी घातली होती. याचा थेट परिणाम त्या देशातील पर्यटन व्यवसायावर झाला. गेल्या अडीच वर्षांमध्ये जगभरातील पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसला आहे. मात्र, आता लॉकडाऊननंतर अनेक देशांतील पर्यटन स्थळे परदेशी नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत काही देश परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी मोठ्या ऑफर्स देत आहेत. अशीच एक खास ऑफर हाँगकाँग (Hong Kong) देत आहे.

तर, परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी मोफत प्रवासाची संधी आहे. हाँगकाँगने आपल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी नवीन योजना आणली आहे, ज्या योजनेअंतर्गत हाँगकाँगला येणाऱ्या प्रवाशांना मोफत प्रवासाचा लाभ मिळणार आहे.

हाँगकाँगचे नेते जॉन ली यांची ही ऑफर अशा लोकांसाठी आहे ज्यांना कोविड-19 नंतर आता तीन वर्षांनी व्यवसाय करण्यासाठी किंवा प्रवास करण्यासाठी हाँगकाँगमध्ये यायचे आहे. ‘हॅलो हाँगकाँग’ (Hello, Hong Kong) असे या मोहिमेचे नाव आहे. नुकतीच एका खास कॉन्फरन्स हॉलमध्ये याची सुरुवात झाली. या मोहिमेच्या उद्घाटन समारंभात ‘हॅलो हाँगकाँग’चा नारा देण्यात आला. ही घोषणा रशियन आणि स्पॅनिशसह विविध भाषांमध्ये देण्यात आली.

याबाबत सोशल मिडियावरही माहिती देण्यात आली आहे. ज्यामध्ये म्हटले आहे ‘हॅलो, हाँगकाँग! आम्ही तुमचे परत स्वागत करण्यास तयार आहोत. शहर एक्सप्लोर करण्यासाठी Aaron Kwok आणि Sammi Cheng सारख्या हाँगकाँग स्टार्सना फॉलो करूया! वेलकम ड्रिंकचा आनंद घेण्यासाठी आम्ही 500,000 मोफत विमान तिकिटे आणि व्हाउचर देखील देणार आहोत!’

यावेळी जॉन ली म्हणाले की, ‘या योजनेद्वारे दिसून येईल की हे शहर पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे आणि चायनीज (चीन) विशेष प्रशासकीय क्षेत्रामध्ये व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे हा त्याचा उद्देश आहे.’ ली पुढे म्हणाले, हाँगकाँग आता मुख्य भूमी चीन आणि संपूर्ण आंतरराष्ट्रीय जगाशी जोडले गेले आहे. येथे कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत किंवा कोविड आयसोलेशनचा कोणताही नियम नाही. जगभरातील लोक येथे येऊन शहराचा आनंद लुटू शकतात.’ (हेही वाचा: मुंबईत हॉप ऑन-हॉप ऑफ बस सेवा सुरू; जाणून घ्या कुठे कराल बुकिंग)

‘हॅलो हाँगकाँग’ मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी शहरातील पर्यटन, व्यवसाय आणि विमान सेवा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, 1 मार्चपासून कॅथे पॅसिफिक, हाँगकाँग एक्सप्रेस आणि हाँगकाँग एअरलाइन्स या एअरलाइन्सद्वारे सहा महिन्यांसाठी परदेशातून येणाऱ्या लोकांना मोफत विमान तिकिटे वितरित केली जातील. या तिकिटांची किंमत सुमारे $254.8 दशलक्ष असेल. हाँगकाँगने विमान उद्योगाला मदत करण्यासाठी मदत पॅकेजचा भाग म्हणून या प्रदेशातील देशांतर्गत विमान कंपन्यांकडून ही हवाई तिकिटे खरेदी केली होती.