किल्ले जंजिरा (Photo Credit : Facebook)

Shiv Jayanti 2019: महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांची आज जयंती. 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरी गडावर महाराजांचा जन्म झाला. माता जीजाऊंच्या सानिध्यात वाढलेल्या शिवाजी महाराजांनी स्वतंत्र मराठा साम्राज्याची स्थापना करून, मराठी लोकांना अस्मिता प्राप्त करून करून दिली. महाराजांचे आचारविचार, त्यांच्या शिकवणी आजही जनतेच्या काळजावर ब्रह्मवाक्यासारख्या कोरल्या आहेत. आजही महाराजांचा जीवनपट उत्तम राजा, उत्तम, पुत्र, उत्तम पिता, उत्तम राजकारणी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे उत्तम माणूस असल्याचे उदाहरण घालून देतो. 1947 साली वयाच्या सतराव्या वर्षी, त्यांनी तोरणा सर केला, इथूनच स्वराज्य स्थापनेला सुरुवात झाली. इ.स. 1659 पर्यंत शिवाजीराजांनी जवळपासच्या पश्चिम घाटातील आणि कोकणातील चाळीस किल्ले जिंकले होते. पुढे 6 जून 1674 साली महाराजांचा राज्याभिषेक झाला. आपल्या स्वतंत्र असलेल्या प्रजेला सुखी समाधानी ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध जो ऐतिहासिक संघर्ष केला, आज तो इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी कोरला आहे. म्हणूनच ‘हिंदुस्तानची ओळख एका वाक्यात सांगायची म्हटले तर शिवछञपतींचा पराक्रम त्यांचे अद्वितीय कार्य’ असे रविँद्रनाथ टागोर यांनी सांगितले आहे.

शिवाजी महाराजांनी आपल्या शासन काळात जवळजवळ 350 किल्ले जिंकल्याची नोंद आहे. मात्र शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात असा एक किल्ला होता जो त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही जिंकता आला नाही. हा अजेय किल्ला म्हणजे जंजिरा ! अरबी भाषेतील जझीरा या शब्दावरुन जंजिरा शब्द आलेला आहे, जझीरा म्हणजे बेट. राजापुर खाडीच्या तोंडावर मोक्याच्या जागी हा अजेय जलदुर्ग उभा आहे.

इतिहास - जंजिरा स्वतंत्र कोळी राजाच्या सत्तेखाली होता. या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहेमीच उपद्रव होत असे. तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी बेटावर मेढेकोट उभारण्यात आला. तिथेच जंजिऱ्याचा पहिला दगड रोवला गेला. 1485 मध्ये जुन्नरच्या मलिक अहमदने जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा कोळ्यांचा नेता होता रामभाऊ कोळी. अभेद्य किल्ला आणि रामभाऊचा पराक्रम या पुढे मलिकने हात टेकले. नंतर पिरमखानाने मेढेकोटच्या आजुबाजूला गलबते लावली आणि राम पाटीलाला दारू पाजून बेहोष केले व मेढेकोट आपल्या ताब्यात घेतला. 1567 मध्ये हुसेन निजामशहाच्या हुकुमानुसार लाकडी मेढेकोटा ऐवजी दगडी कोट बांधण्यास सुरुवात केली. हे काम इ.स. 1571 पर्यंत झाले आणि हा दगडी कोट ‘किल्ले मेहरुब’ नावाने ओळखला जाऊ लागला. पुढे इ.स. 1617 मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानचा हा मूळ पुरुष समजला जातो.

शिवाजी महाराजांचाही प्रयत्न फसला - इ.स. 1648 मध्ये शिवरायांनी तळेगड, घोसाळगड आणि रायगड परिसरातील मुलूख जिंकला. 1657 मध्ये जावळी जिंकली आणि त्यांनी आपली नजर उत्तर कोकणावर वळवली. किल्ले जंजिरा आपल्या ताब्यात आल्याशिवाय उत्तर कोकणावर आपण वर्चस्व गाजवू शकणारा नाही हे सत्य शिवरायांना उमगले होते. 1659 मध्ये शिवरायांनी शामराजपंत व त्या सोबत बाजी घोलपला जंजिरा घेण्यासाठी पाठवले पण, हा पहिला प्रयत्न फसला. अशा प्रकारे तीन प्रयत्न करूनही शिवरायांना जंजिरा जिंकता आला नाही.

थोरल्या महाराजांनंतर शंभू महाराजांनीदेखिल 1682 मध्ये जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला होता. किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीक पाच सहा किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला त्यांनी उभारला, पण तरीही मुरुडचा जंजिरा जिंकणे महाराजांना शक्य होऊ शकले नाही.

गडाची उंच व मजबून बांधणी, खळाळणाऱ्या लाटांचे संरक्षण, किल्ल्यात सहजासहजी कोणी प्रवेश करू नये म्हणून योजलेले अनेक अचंबे, गडाच्या पाठीशी कलाल बांगडीच्या नेतृत्वाखाली सदैव तत्पर असणाऱ्या 514 तोफा यांमुळे हा किल्ला शेवटपर्यंत अजेयच राहिला. सिद्दी सत्ताधीशांनंतर आलेल्या सिद्दी मुहमंदखान हा शेवटचा सिद्दी असताना, व त्या राज्याच्या स्थापनेनंतर 330 वर्षांनी, म्हणजे 3 एप्रिल 1948 रोजी जंजिरा भारतीय संघराज्यात विलीन झाला.