Pune Bhimthadi Jatra (संग्रहित संपादित प्रतिमा)

पुण्यात (Pune) दरवर्षी अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्या वतीने ‘भीमथडी जत्रेचे’ (Bhimthadi Jatra) आयोजन केले जाते. भीमथडी जत्रा ही पुण्यातील सर्वात मोठ्या ग्रामीण आनंदोत्सवांपैकी एक आहे. आता यंदाही 20 ते 25 डिसेंबर या कालावधीत या जत्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. ही जत्रा सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. या जत्रेची ही 18 वी आवृत्ती असेल. भीमथडीचा अर्थ होतो भीमा नदीच्या शेजारी असणारी संस्कृती. या जत्रेत ठिकाणी कलाकुसरीच्या वस्तू, सजावटीचे साहित्य, कपडे, हातमागावरील साड्या, मसाला आणि लोणचे अशा अनेक गोष्टी विक्रीसाठी उपलब्ध असतात. यासह महाराष्ट्राच्या विविध भागांतील अस्सल गावरान चवीच्या शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचा आस्वाद घेता येतो.

ही जत्रा दुकानदारांचे नंदनवन आहे, कारण सेंद्रिय कापूस, खादी, तागाचे आणि नैसर्गिक रंग यासारख्या नैसर्गिक साहित्याचा वापर करून देशाच्या विविध भागांतील डिझायनर आणि कारागीरांनी तयार केलेले कपडे या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असते. काही वर्षांपूर्वी बारामती परिसरातील महिलांना एकत्र येत, बचत गट स्थापन केले. पुढे या महिलांनी बचत गटामार्फत तयार होणाऱ्या गोष्टींसाठी भीमथडी जत्रेच्या माध्यमातून आपले स्वतःचे हक्काचे व्यासपीठ उभे केले. आता गेल्या 18 वर्षांमध्ये या जत्रेने मोठी लोकप्रियता मिळवली आहे.

Pune Bhimthadi Jatra-

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhimthadi Jatra (@bhimthadijatra)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhimthadi Jatra (@bhimthadijatra)

भीमथडी जत्रेचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व स्टॉल मुख्यतः बचत गटांच्या (SHGs) स्त्रिया चालवतात. येथे, त्यांना त्यांचे कौशल्य सादर करण्याची आणि त्यातून आकर्षक आर्थिक बक्षिसे मिळविण्याची संधी दिली जाते. भीमथडी जत्रेमध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाचे दर्शन इथे घडते. त्यामुळे ‘कॉस्मोपॉलिटिन’ बनलेल्या पुण्यातील नागरिकांना या जत्रेचे प्रचंड आकर्षण असते. गावातील यात्रा-जत्रा, उरूस, बारा बलुतेदार, लोककला आणि लोककलाकार, ग्रामीण खेळ यांविषयी नव्या पिढीला माहिती होण्यासाठी ही जत्रा एक उत्तम मार्ग आहे. (हेही वाचा: New Mahabaleshwar: नवीन महाबळेश्वर प्रकल्पाचा विकास आराखडा प्रसिद्ध; ट्रेकिंग, वॉटर स्पोर्ट्स, टॉय ट्रेन्स, केबल सिस्टिमसह अनेक बाबींचा समावेश, जाणून घ्या सविस्तर)

खरेदी विक्रीशिवाय बैलगाडीतील सैर, ज्योतिष सांगणारे, पाथरवट, लोककला, लावणी, गाण्यांची मैफल, पोवाडा, मुलांसाठी खेळ अशा अनेक मनोरंजनाच्या बाबींचाही समावेश या जत्रेमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील लोकांशिवाय आजूबाजूच्या परिसरातील लोक वर्षभर या जत्रेची वाट पाहत असतात. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार या जत्रेतील स्टॉल आधीच विकले गेले आहेत आणि या वर्षासाठी चौकशी बंद आहे.