Habit of Staying Awake Till Late Night (PC- pexels)

Study On Habit of Staying Awake Till Late Night: आजकाल कामाचा वाढता ताण आणि धावपळीमुळे लोकांच्या जीवनशैलीत झपाट्याने बदल होत आहेत. आजकाल अनेकांना रात्री उशिरापर्यंत जागे राहण्याची सवय लागली आहे. ऑफिसचे काम, अभ्यास याशिवाय सोशल मीडियाच्या वापरामुळे अनेकजण रात्रभर जागरण करतात. आजकाल रात्री उशिरापर्यंत जागणे हा आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या सवयी आणि बिघडलेली जीवनशैली अनेक समस्यांना कारणीभूत ठरू शकते.

रात्री उशिरापर्यंत जागरण करण तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. तुम्हालाही दीर्घायुष्य हवे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. किंबहुना, नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात रात्री उशिरापर्यंत जागरण करण्याबाबत एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अभ्यासात असे आढळून आले आहे की, रात्री उशिरापर्यंत जागे राहण्याची तुमची सवय तुम्हाला मृत्यूच्या जवळ घेऊन जाऊ शकते. (हेही वाचा - Fertility and Sexual Health: प्रजननक्षमता आणि लैंगिक आरोग्यामध्ये येणार क्रांती; Lifecell तर्फे आधुनिक पद्धतीच्या सेल्फ-कलेक्शन आरोग्य सेवा लाँच)

वास्तविक, रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने अनेक गंभीर आणि जीवघेण्या आजारांचा धोका वाढतो. अभ्यासानुसार, अशा लोकांना, ज्यांना रात्री जागण्याची सवय आहे, त्यांना कमी वयात मृत्यू येण्याचा धोका लक्षणीय वाढतो. रात्री जागरण करणाऱ्या लोकांमध्ये धूम्रपान आणि मद्यपानाची सवय खूप जास्त असते, जी शरीरासाठी आणि आरोग्यासाठी हानिकारक ठरते.

दरम्यान, फिनलंडमधील फिनिश इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थमध्ये करण्यात आलेला हा अभ्यास 'क्रोनोबायोलॉजी इंटरनॅशनल'मध्ये प्रकाशित झाला आहे. या संशोधनात असे समोर आले आहे की, रात्री उशिरापर्यंत जागरण केल्याने शरीर अनेक आजारांना बळी पडू शकते, ज्यामुळे कमी वयात मृत्यूचा धोका वाढतो. 1980 ते 2022 पर्यंत चाललेल्या या अभ्यासात सुमारे 23,000 लोकांचा समावेश करण्यात आला आहे.

अभ्यासादरम्यान, सहभागी 8,728 लोकांचा मृत्यू झाला. या मृत्यूच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता धक्कादायक माहिती समोर आली. संशोधनात असे आढळून आले की, जे लोक रात्री जागतात त्यांना मृत्यूचा धोका सकाळी लवकर उठणाऱ्यांपेक्षा 9 टक्के जास्त असतो. तथापि, अभ्यासात असेही समोर आले आहे की, जे लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. परंतु, ते मद्यपान करत नाहीत त्यांना लवकर मृत्यूचा धोका उद्धभवत नाही.

मात्र, याउलट रात्री उशिरापर्यंत जागून नशा केल्याने तरुण वयात मृत्यूचा धोका वाढतो. अभ्यासाचे लेखक क्रिस्टर हब्लिन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, रात्री जागे राहणाऱ्या व्यक्तींमध्ये मृत्यूचा धोका तेव्हाच वाढतो जेव्हा ते मोठ्या प्रमाणात तंबाखू आणि मद्यपान करतात.