Super Blood: 'माझ्या 'सुपर ब्लड'मुळे माझ्या वडिलांचे वय 25 वर्षांनी कमी झाले; अब्जाधीश Bryan Johnson चा धक्कादायक दावा, जाणून घ्या सविस्तर
Bryan Johnson (संग्रहित संपादित प्रतिमा)

‘वाढते वय’ ही न थांबणारी आणि नियंत्रणात नसणारी गोष्ट आहे. अनेकजण आपले खरे वय लपवण्यासाठी बऱ्याच गोष्टी करतात. असाच प्रयत्न्न सॉफ्टवेअर अब्जाधीश ब्रायन जॉन्सनदेखील (Bryan Johnson) करत आहे. ब्रायन जॉन्सनचे नाव कदाचित तुम्ही ऐकले असेल. हा एक 45 वर्षांचा माणूस असून, त्याला त्याचे वृद्धत्व थांबवायचे आहे. यासाठी तो अनेक ट्रीटमेंट्स घेत आहेत व ज्यावर वर्षाला त्याचे जवळजवळ 16 कोटी रुपये खर्च होत आहेत. तर अलीकडेच ब्रायनने सोशल मीडिया पोस्टद्वारे एक आश्चर्यकारक दावा केला आहे. त्याने सांगितले की, त्याच्या 'सुपर ब्लड'मुळे त्याच्या वडिलांचे वय 25 वर्षांनी कमी झाले आहे.

जॉन्सन म्हणाला की, त्याच्या 70 वर्षीय वडिलांना त्याचा 1 लिटर प्लाझ्मा देण्यात आला. तेव्हापासून त्याचे वडील 46 वर्षांच्या माणसाच्या दराने वृद्ध होत आहेत. याआधी ते 70 वर्षीय व्यक्तीच्या दराने वृद्ध होत होते. या प्रक्रियेत सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचेही तो म्हणाला.

ब्रायन जॉन्सनने X वर लिहिले की, ‘माझे वडील 70 वर्षांचे आहेत. माझा 1 लिटर प्लाझ्मा घेतल्यानंतर, त्यांचा वृद्धत्वाचा वेग 25 वर्षांनी कमी झाला आहे. 6 महिन्यांच्या उपचारानंतरही तो त्याच पातळीवर राहिला आहे. याचा अर्थ काय? तर, आपण जितके मोठे होतो तितक्या लवकर आपण वृद्ध होतो. मात्र, माझा 1 लिटर प्लाझ्मा मिळाल्यानंतर माझे वडील आता 46 वर्षांच्या वयानुसार वृद्ध होत आहेत. माझ्या सुपर रक्तामुळे माझ्या वडिलांचे वय 25 वर्षांनी कमी झाले आहे.’ (हेही वाचा: Mobile Phone Use and Sperm Count: स्मार्टफोनच्या अति वापरामुळे पुरुषांमध्ये वाढू शकते नपुंसकता; अभ्यासात झाला धक्कादायक खुलासा, जाणून घ्या सविस्तर)

दरम्यान, ब्रायन जॉन्सन हा अमेरिकेतील कॅलिफोर्नियास्थित KernelCo बायोटेक कंपनीचा सीइओ आहे, जो सध्या 45 वर्षांचा आहे. त्याला आपल्या शरीराचे वय 18 वर्षांच्या मुलाइतके कमी करायचे आहे. त्याने अलीकडेच एका मीडिया मुलाखतीत सांगितले की, तो दररोज 111 गोळ्या घेतो. त्याच्या तब्येतीच्या प्रगतीचा मागोवा ठेवण्यासाठी तो विविध आरोग्य निरीक्षण उपकरणे देखील वापरतो.

या वर्षी फेब्रुवारीमध्ये, ब्लूमबर्गमध्ये ब्रायन जॉन्सनबद्दल एक अहवाल प्रकाशित झाला होता. यामध्ये ब्रायनच्या स्वत:ला तरुण बनवण्याच्या त्याच्या प्रयत्नांबद्दल भाष्य केले होते. सध्या सुरू असलेल्या या प्रयत्नांना त्याच्या डॉक्टरांच्या टीमने 'प्रोजेक्ट ब्लू प्रिंट' असे नाव दिले आहे. यामध्ये त्याच्या खाणे, झोपणे आणि व्यायामाबाबत विशेष योजना तयार करण्यात आली असून, डॉक्टरांची टीम त्याच्यावर सतत लक्ष ठेवून आहे. जॉन्सन यावर दरवर्षी 2 दशलक्ष डॉलर्स खर्च करतो.