Plastic Containers

आजकाल, झोमॅटो-स्विगी वरून ऑनलाइन अन्न (online Food) ऑर्डर करण्याचा ट्रेंड खूप लोकप्रिय आहे. घरी जेवणाचे पदार्थ मागवले जात आहेत. घरच्या घरी चविष्ट जेवण ऑर्डर करण्याच्या सोयीमुळे जीवन खूप सोपे झाले आहे. मात्र, ही सोपी पद्धत तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. हे पदार्थ प्लास्टिकच्या (Plastic) डब्यात किंवा पॅकेटमध्ये येतात, जे खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. प्लास्टिकच्या डब्यात अन्न खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. यामुळे जीवघेणा आजार होण्याचा धोका असतो. एका अभ्यासात हे उघड झाले आहे. त्यापैकी सर्वात गंभीर म्हणजे हृदयविकाराचा धोका.

Sciencedirect.com मध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये अन्न खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. विशेषतः, रक्तसंचयी हृदय अपयशाचा धोका वाढू शकतो. संशोधकांचे म्हणणे आहे की, अन्नासोबत हे प्लास्टिकचे छोटे कण आपल्या पोटात जातात आणि रक्ताभिसरण प्रणालीला गंभीर नुकसान करतात, ज्यामुळे अनेक धोके निर्माण होतात.

प्लास्टिकच्या पॅकेजमध्ये अन्न खाणे आणि हृदयरोगाचा धोका यांच्यातील संबंध शोधण्यासाठी संशोधकांनी दोन टप्प्यात संशोधन केले. पहिल्या टप्प्यात, 3,000 हून अधिक चिनी लोकांच्या खाण्याच्या सवयींचा अभ्यास करण्यात आला; प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये जेवणाऱ्यांना हृदयविकाराचा गंभीर धोका असल्याचे आढळून आले. दुसऱ्या टप्प्यात, उंदरांवर संशोधन करण्यात आले. उंदरांना अशा पाण्यात ठेवण्यात आले होते जिथे काळ्या प्लास्टिकच्या डब्यांमधून रसायने बाहेर पडत होती. प्लास्टिक रसायनांच्या वारंवार संपर्कात आल्यामुळे उंदरांमध्ये हृदयविकाराची लक्षणे दिसून आली.

संशोधनातून असे दिसून आले आहे की, प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये, पॅकेटमध्ये किंवा कंटेनरमध्ये अन्न खाल्ल्याने हृदयरोग वाढू शकतात. जेव्हा आपण प्लास्टिकच्या डब्यात किंवा पॅकेटमध्ये ठेवलेले अन्न खातो तेव्हा ते छोटे प्लास्टिकचे कण आपल्या शरीरात प्रवेश करतात. हे कण आपल्या पोटातील अवयवांवर विपरीत परिणाम करतात. याशिवाय, प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये वापरले जाणारे रसायने शरीरात प्रवेश करतात आणि रक्तप्रवाहावर परिणाम करतात, ज्यामुळे हृदय आणि इतर अवयवांना नुकसान होऊ शकते. (हेही वाचा: Smartphone Use and Mental Health: स्मार्टफोनच्या वापरामुळे 13-17 वयोगटातील मुलांच्या मेंदूवर होत आहे नकारात्मक परिणाम; वाढत आहे राग, चिडचिडेपणा, आक्रमकता, नैराश्य आणि चिंता- Study)

प्लास्टिक पॅकेजेसमध्ये वापरले जाणारे बिस्फेनॉल ए (बीपीए) आणि फॅथलेट्स सारखे रसायने शरीरात प्रवेश करू शकतात आणि हार्मोनल असंतुलन निर्माण करू शकतात. याव्यतिरिक्त, या रसायनांमुळे जळजळ आणि रक्तप्रवाहात समस्या निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे हृदयावर दबाव वाढतो. जर ही स्थिती दीर्घकाळ राहिली तर हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. जर तुम्ही प्लास्टिकच्या पॅकेजेस वापरणाऱ्या ठिकाणाहून अन्न ऑर्डर करत असाल, तर हा पर्याय टाळण्याचा प्रयत्न करा किंवा किमान पॅकेजिंगमधून अन्न काढून सुरक्षित कंटेनरमध्ये साठवा. जर तुम्ही झोमॅटो किंवा स्विगी वरून अन्न ऑर्डर करत असाल, तर प्लास्टिकच्या पॅकेटऐवजी बायोडिग्रेडेबल किंवा इको-फ्रेंडली पॅकेजिंगचा पर्याय निवडणे चांगले.