Winter Hair Care Tips: हिवाळ्यात 'अशी' घ्या केसांची काळजी, जाणून घ्या खास टिप्स
Hair care for Winter (Photo Credits: Pixabay)

Winter Hair Care Tips: ऋतूमानानुसार केसांचे आरोग्य राखणे आवश्यक असते. हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. त्यामुळे केसांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्वचा कोरडी झाल्याने केस गळण्यास सुरूवात होते. तसेच केसांची चमकही कमी होते. त्यामुळे हे सर्व परिणाम होण्याअगोदर योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. हिवाळ्यात केसांच्या समस्यांमध्ये वाढ होत असते.

यंदा हिवाळा उशीरा सुरू झाला आहे. राज्यातील अगदी काही शहरात सध्या थंडी वाजायला सुरूवात झाली आहे. मुंबई शहरामध्येही थंडीची चाहूल जाणवायला लागली आहे. त्यामुळे हिवाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी, याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. (हेही वाचा - आला थंडीचा महिना, त्वचा सांभाळा; या साध्या Winter Skin Care Tips वापरा आणि रहा हेल्दी)

हिवाळ्यात अशी घ्या केसांची काळजी -

गरम तेलाचा वापर करा -

हिवाळ्याच्या दिवसांत डोक्याची त्वचा कोरडी होत असते. त्यामुळे डोक्यात कोंडा होतो. यापासून सुटका करायची असेल तर गरम तेलामध्ये लिंबाचा एक चमचा रस मिसळून लावा. रात्री हे मिश्रण लावा आणि सकाळी कोमट पाण्याने केस धुऊन काढा.

केसांच्या मुळाला लावा मध -

थंडीमुळे केसांची चमक फिकी पडते. त्यामुळे हिवाळ्यात केसांची चमक वाढवण्यासाठी केसांच्या मुळांना मध लावा. त्यानंतर केसांना एक तास टॉवेलने बांधून ठेवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने केस धुऊन काढा. असे केल्यास केस पुन्हा चमकदार होतील.

ओले केस बांधवून ठेऊ नका -

थंडीच्या दिवसांत केसांना बांधून ठेवू नका. असे केल्यास त्यात उवा होण्याची भिती असते. तुम्ही हेअर ड्रायरने व्यवस्थितरित्या केस वाळवले असतील तर तुम्ही बुचडा किंवा वेणी घालू शकता.

आठवड्यातून 2 वेळा केस धुवा -

हिवाळ्यात आठवड्यातून दोन वेळा केस धुवा. केस धुतल्यानंतर त्याला कंडिशनर करणे विसरू नका. केसांत नेहमी स्वच्छता ठेवा.

केसांना नियमित तेल लावा -

डोक्यातील कोंड्यामुळे केसं कमकुवत होतात. हिवाळ्यात डोक्यात जास्त प्रमाणात कोंडा होतो. म्हणून डोक्यातील कोंडा कमी करण्यासाठी नियमितपणे डोक्यात तेल लावणे आवश्यक असते.

गरम पाणी वापरू नको -

थंडीच्या दिवसांत गरम पाण्याने केस धुणं टाळा. केस धुण्यासाठी अगदी कोमट पाण्याचा वापर करा.

सोप्या हेअरस्टाइल्स करा -

हिवाळ्यात केसांना फार त्रास देणाऱ्या हेअरस्टाइल्स करू नका. त्याऐवजी साध्या व सोप्या हेअरस्टाइल करा. अवघड हेअरस्टाइल्स केल्यास जास्त वेळ ठेवू नका.

केसांचं आरोग्य चांगलं रहावं यासाठी कॅल्शियम आणि बायोटीन असेलल्या घटकांच्या पदार्थांचा आहारात समावेश करा. जसं की, अंड, मासे, काजू, बेरी, हिरव्या पालेभाज्या, दुग्धजन्य पदार्थ, पनीर, ताक, दही इत्यादी. यामुळे केसगळतीची समस्या उद्भवणार नाहीत. हिवाळ्यात योग्य आहार घेतल्याने केसांचे आरोग्य राखण्यास मदत होते.