Heart Attacks Double In Winter: थंड हवामानामुळे इन्फ्लूएन्सा, सांधेदुखी, घसा खवखवणे, दमा, COVID-19 आणि हृदयविकार यासारख्या वैद्यकीय समस्या उद्भवतात. मॅक्स हॉस्पिटल्सचे कार्डिओलॉजीचे अध्यक्ष आणि प्रमुख डॉ. बलबीर सिंग यांच्या मते, थंडी आणि खराब जीवनशैलीमुळे हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या गेल्या महिन्याच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. आपल्या देशात हृदयविकाराच्या समस्या वाढत आहेत. हिवाळ्यात हृदयावर मोठा ताण निर्माण होतो. त्यामुळे या दिवसात हृदयाची काळजी घेणं आवश्यक आहे. या काळात लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा इशारा अमेरिकन हार्ट असोसिएशनने दिला आहे. SSM Health.com च्या मते, ख्रिसमस आणि जानेवारीच्या सुट्ट्यांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attacks) अधिक लोकांचा मृत्यू होतो. भारतातील हृदयरोग तज्ज्ञांच्या मते, थंडीच्या काळात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका सर्वाधिक असतो. या काळात भारतात हृदयविकाराच्या झटक्याचे सर्वाधिक रुग्ण आढळतात. थंडी, हवामानातील बदल, प्रदूषणाची वाढती पातळी आणि अनियमित शारीरिक हालचाल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे डिसेंबर आणि जानेवारीमध्ये सर्वाधिक प्रकरणे नोंदवली जातात.
या काळात, बीपी आणि हृदयविकाराशी संबंधित रुग्णांसह सर्वांनी विशेषतः थंडीत बाहेर जाण्याअगोदर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. हे टाळण्यासाठी आवश्यक तपासण्या करून आणि हृदयविकाराचा संशय आल्यास खबरदारी घेतल्यास हृदयविकाराचा झटका टाळता येतो. (हेही वाचा - Deaths Due to Heart Ailments: महाराष्ट्रात 2022 मध्ये 200 हून अधिक मुलांचा हृदयविकाराने मृत्यू)
तथापी, गुरूग्राम सनार इंटरनॅशनल हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागाचे संचालक डॉ. डी. के. झांब यांनी सांगितले की, हिवाळ्यात नवीन हृदयरुग्णांची संख्या वाढते. त्यापैकी बहुतेक 55-60 वयोगटातील आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबरच्या तुलनेत गेल्या महिन्यात दिल्ली-एनसीआरमधील हृदयविकाराच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडियाचे (सीएसआय) माजी सरचिटणीस आणि कोलकाता येथील ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. देबब्रत रॉय यांनी सांगितले की, थंड हवामान हृदयविकारासाठी सर्वात धोकादायक आहे. आउटिंग दरम्यान अनियमित शारीरिक हालचाली आणि अस्वस्थ खाण्याच्या सवयी यामुळे याचा धोका वाढतो. अनेक संशोधनातून असे समोर आले आहे की, आता तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणात हृदयविकाराच्या झटक्याची नोंद होत आहे. (हेही वाचा - Deaths Due to Heart Disease: मुंबईत 2022 मध्ये दर चौथा मृत्यू हा हृदयविकारामुळे; BMC ने जाहीर केली धक्कादायक आकडेवारी)
डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात हृदयविकाराचा सर्वाधिक धोका -
एसएसएम हेल्थ डॉट कॉमवरील एका लेखात असे सांगण्यात आले आहे की सुट्टीच्या काळात, विशेषत: डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात संपूर्ण वर्षाच्या तुलनेत जास्त लोकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो. एसएसएम हेल्थचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. ताडिओ डायझ बालडर्मा यांनी सांगितले की, 24, 25 डिसेंबर आणि 1 जानेवारीला हृदयविकाराच्या झटक्याने सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. त्यांच्या मते, थंड हवामान हे हृदयाशी संबंधित मृत्यूचे प्रमुख कारण आहे. या मोसमात धोका कमी करण्यासाठी अनेक गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. हृदयविकाराच्या झटक्याशी संबंधित लक्षणे दिसू लागल्यावर मदतीची वाट पाहू नये, सतर्क राहावे लागेल.