Air Pollution: वायू प्रदूषणामुळे वाढतोय गंभीर आजारांचा धोका; वाढत्या प्रदूषणाचा सामना करताना निरोगी फुफ्फुसांसाठी फॉलो करा 'या' टिप्स
Air Pollution, Lungs (PC - pixabay)

Air Pollution: प्रदूषणाशी लढण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमच्या फुफ्फुसाचं आरोग्य निरोगी (Healthy Lungs) ठेवणे. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, दिल्ली आणि आसपासच्या परिसराचा AQI 400 च्या पुढे गेला आहे. इतक्या जास्त तीव्रतेचे प्रदूषण आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे तुमच्या फुफ्फुसांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. प्रदूषणामुळे होणाऱ्या समस्यांमध्ये फुफ्फुसाचा संसर्ग, फुफ्फुसाचा कर्करोग, हृदयविकार इ. यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवू शकता. आपण आपल्या फुफ्फुसांची काळजी कशी घेऊ शकतो हे जाणून घेऊयात...

व्यायामामुळे तुमची फुफ्फुसे मजबूत होतात. यामुळे तुमच्या फुफ्फुसाची श्वास घेण्याची क्षमता वाढते. एरोबिक व्यायाम आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम अधिक फायदेशीर असू शकतात. तुमची फुफ्फुस मजबूत करण्यासाठी प्राणायाम देखील खूप फायदेशीर आहे. मात्र, प्रदुषण सर्वाधिक असताना सकाळी लवकर व्यायाम करण्यासाठी बाहेर पडू नका. त्याचप्रमाणे संध्याकाळी घराबाहेर पडून व्यायाम करू नका. यावेळी हवा अधिक प्रदूषित असते आणि यावेळी बाहेर व्यायाम करणे फायदेशीर होण्यापेक्षा हानिकारक ठरू शकते. (हेही वाचा - Skin Care Tips For Winter: हिवाळ्यात 'अशी' घ्या त्वचेची काळजी; 'या' खास टीप्सचा वापर करून मिळवा कोरड्या त्वचेवर परफेक्ट सोलूशन)

निरोगी आहाराचे सेवन -

सकस आहार तुमच्या एकूण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते. तुमच्या आहारात काही खाद्यपदार्थांचा समावेश केल्यास प्रदूषणाच्या प्रभावापासून तुमचे संरक्षण होऊ शकते. तुमच्या आहारात संत्री, बेरी, हळद इत्यादी अँटी-ऑक्सिडंट्स युक्त पदार्थांचा समावेश करा. हे प्रदूषणामुळे होणारे नुकसान कमी करण्यास मदत करतात. आपल्या आहारात सॅल्मन सारख्या ओमेगा-3 फॅटी ऍसिडस् समृद्ध अन्नपदार्थांचा देखील समावेश करा. तुमच्या फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे.

धूम्रपान करू नका -

धूम्रपानामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. याशिवाय तुमच्या हृदयावरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे धूम्रपान टाळा. प्रदूषणामुळे होणारे नुकसान कमकुवत फुफ्फुसांवर लवकर होते. त्यामुळे धुम्रपान अजिबात करू नका. तसेच, ज्या ठिकाणी कोणी धूम्रपान करत असेल तेथे थांबू नका.

वाफ घ्या -

प्रदूषणामुळे अनेक प्रदूषके आपल्या श्वसनमार्गामध्ये जमा होत राहतात. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, घसा खवखवणे, खोकला यासारख्या समस्या उद्भवू शकतात. गरम पाण्याची वाफ घेणे तुमच्या श्वसन आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुमच्या श्वसनमार्गामध्ये साचलेली घाण देखील साफ होते आणि तुम्ही श्वासोच्छ्वास चांगला घेऊ शकता. त्यामुळे वाढत्या प्रदूषणाच्या हंगामात दररोज वाफ घेणे फायदेशीर ठरू शकते.

केवळ कामानिमित्तचं बाहेर पडा -

प्रदूषण इतके वाढले आहे की बाहेर जाणे तुमच्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे काम असेल तेव्हाच बाहेर जाण्याचा प्रयत्न करा. आत्ताच बाहेर फिरायला जाऊ नका. हे विशेषतः लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे काम असेल तेव्हाच बाहेर जा. तसेच घरात एअर प्युरिफायर वापरा.

Disclaimer: लेखात नमूद केलेला सल्ला आणि सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहेत आणि व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नयेत. आपल्याला काही प्रश्न किंवा चिंता असल्यास, नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.