Ad5-nCoV Inhaled Covid-19 Vaccine: जगातील पहिली फक्त वास घेऊन कोरोनाला प्रतिबंध करणारी लस; चीनने दिली आपत्कालीन वापरासाठी मान्यता
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

जगात प्रथमच कोरोना विषाणूवर इनहेल्ड लस तयार करण्यात आली आहे. चीनने या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. या लसीचा नाकाद्वारे वास घेऊन कोरोनाला प्रतिबंध करता येऊ शकेल. या लसीचे नाव Ad5-nCoV असून ती नीडल-फ्री असल्याने लोक या लसीला प्राधान्य देऊ शकतील असे कंपनीचे म्हणणे आहे. ही लस टियांजिन स्थित CanSino Biologics Inc ने बनवली आहे. चीन सरकारच्या या निर्णयामुळे हाँगकाँगमधील या लस निर्मात्या कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवारी सकाळी 14.5 टक्क्यांनी वाढ झाली.

चीनच्या नॅशनल मेडिकल प्रॉडक्ट्स अॅडमिनिस्ट्रेशनने कॅनसिनोच्या Ad5-nCoV ला बूस्टर लस म्हणून आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे, असे कंपनीने रविवारी हाँगकाँग स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या लसीच्या पहिली आवृत्तीची मार्च 2020 मध्ये मानवी चाचणी झाली आणि फेब्रुवारी 2021 मध्ये ती चीन तसेच मेक्सिको, पाकिस्तान, मलेशिया आणि हंगेरीमध्ये वापरली गेली.

अनेक कंपन्या कोरोना विषाणूपासून संरक्षण देण्यासाठी नाकातील ऊतींमधील अँटीबॉडीजवर परिणाम करणाऱ्या लस विकसित करण्याचा विचार करत आहेत. अशी लस इंनीडल-फ्री असल्याने ही लस अधिक लोकांना आकर्षित करेल कारण बरेच लोक इंजेक्शन घेण्यास संकोच करतात. यामुळे कोरोना वॉरियर्सवरील दबावही कमी होण्याची शक्यता आहे. CanSino ने ही लस अतिशय प्रभावी असल्याचे सांगितले आहे. (हेही वाचा: Vaccine On Omicron: सिरम इन्स्टिट्यूट ओमायक्रॉनच्या B5 व्हॅरियंटविरोधात लस निर्मिती करणार)

कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही लस कोविड-19 ची लक्षणे रोखण्यासाठी 66% आणि गंभीर आजारांवर 91% प्रभावी आहे. मात्र हे प्रमाण सिनोव्हॅक बायोटेक लिमिटेड आणि सरकारी मालकीच्या सिनोफार्म ग्रुप कंपनीच्या चीनबाहेर वापरात असलेल्या लसींच्या तुलनेत मागे आहे. चीनने जगभरात पाठवलेल्या 770 दशलक्ष डोसपैकी बहुतेक डोस या दोन कंपन्यांचे आहेत.