तुळस (Photo Credits: Azlin/Pixabay)

तुळशीची पूजा प्रत्येक घराघरात होते. तुळशीचे फार मोठे पौराणिक महत्त्वदेखील आहे. औषधी वनस्पतीच्या रूपातही तुळशीचा उपयोग केला जातो. सर्दी-खोकला यांसारख्या आजारांवर तर तुळस हे गुणकारी औषध आहे. आयुर्वेदामध्येही तुळशीचे फायदे सांगितले आहेत. तुळशीस टॉनिकही म्हंटले जाते कारण यात जीवनसत्व अ, ब आणि अनेक पोषक तत्वे आहेत. म्हणूनच तुळशीच्या पानांचा, मुळांचा, फुलांचा, फांदयांचा, बिजाचा आणि खोडाचा वापर वेगवेगळया प्रकारे औषध म्हणून करता येतो. तुळशीच्या सेवनाने शरीरात सकारात्मक उर्जा प्रवाहीत होते व मानसिक दृष्ट्या व्यक्ती प्रबळ होण्यास मदत होते. चला पाहूयात काय आहेत तुळशीचे आरोग्यदायी फायदे

  1. ताप – लहान बाळांना तापा असल्यास तुळस तेलाने आंघोळीआधी बाळाच्या अंगाची तेल मालीश केल्यास ताप कमी होतो. तुळशीत प्रतिजैविके आणि वेदनानाशके असतात त्यामूळे तापावर तुळशीची पाने खाल्ल्याने आराम मिळतो. तसेच तुळशीच्या पानांचा काढाही ताप कमी करण्यास फायदेशीर ठरतो.
  2. मुखाच्या स्वास्थ्यासाठी – दातांची वेदना, मुखदुर्गंधी, चव नसणे, तोंड कोरडे पडणे या सर्वांवर तुळस पाने चावून खाल्ल्यास फार आराम मिळतो. तुळस पाने एक उत्तम मुखशुध्दीदायक मानले जाते. दातदुखी, कमजोर हिरड्या, दातांतून रक्त येणे, दात किडणे यासर्व गोष्टींसाठी औषध म्हणून तुळशीचा उपयोग केला जातो.
  3. त्वचेची काळजी - तुळशीमध्ये मोठ्या प्रमाणावर अॅन्टीऑक्सिडंट असतात. त्याचप्रमाणे जीवनसत्वे 'अ' आणि 'ब' मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचेचे संक्रमण, त्वचेवर खाज सुटणे यांसाठी तुळशीच्या पानांचा फार उपयोग होतो. तुळशीचे पाने आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ केल्याने त्वचा तजेदार आणि टवटवीत होते.
  4. डोकेदुखी – एका बाजूचे फार डोके दुखणे (मायग्रेन), नाकाच्या हाडाच्या वाढीमुळे डोके दुखणे, सर्दी कफ, उच्च रक्तदाबामुळे डोकेदुखी झाल्यास तुळस पानांचा लेप डोक्यावर लावल्यास डोकेदुखी लवकर बरी होते. तुळस तेलाने डोक्याची व कपाळाची मालीश केल्यास फायदा होतो.
  5. डोळयाची काळजी – डोळयांमध्ये इन्फेक्शन झाल्यास त्यांना तुळशीच्या पानांनी धूतल्यास डोळयातील संक्रमण बरे होते. डोळयांची सूज, आणि डोळे जळजळीवर तूळस तेल डोळयांत 2,3 थेंब टाकल्यास डोळे निरोगी होतात.
  6. कर्करोग - कर्करोगातील आणि टयुमर मधील कोशिका नष्ट करण्यासाठी विविध औषधींमध्ये तुळशीचा वापर होतो. यासोबत जठराचे दुखणे, डांग्या खोकला, काॅलरा, हातपायामधील दुखणे या सर्वांवर चांगले वेदनानाशक मानले जाते.
  7. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते - शरिरातील रोगप्रतिकारक वाढवण्यासाठीही तुळस गुणकारी मानली जाते. तुळशीमध्ये अनेक गुणकारी तत्वे आढळून येतात. ज्यांमुळे शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती, प्लेटलेट्स वाढविण्यासाठी मदत होते. तसेच शरिरातील थकवा दूर करण्यासाठीही तुळस उपयुक्त ठरते.