Shivrajyabhishek Sohala: शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी करण्यात आलेल्या 'या' खास गोष्टी ऐकून तुमच्या अंगावर उभा राहिल रोमांच
Shivrajyabhishek Sohala (Photo Credits: Twitter)

Raigad Shivrajyabhishek Sohala: रायगडावर 6 जून 1674 झालेला 'शिवराज्याभिषेक सोहळा'  हा रायगडावर आलेल्या प्रत्येकासाठी जणू दसरा-दिवाळीच्या उत्सवासारखाच होता. आपल्या लाडक्या राजाला सिंहासनावर बसलेला पाहण्यासाठी असंख्य जनता रायगडावर उपस्थित होती. हा सोहळा ज्यांनी याचि देही याचि डोळा अनुभवला त्या प्रत्येकाच्या मनात आपण धन्य झालो ही एकच भावना होती. या सोहळ्यात अशा काही खास गोष्टी करण्यात आल्या ज्या केवळ ऐकून तुमच्या अंगावर रोमांच उभा राहिल्याखेरीज नाही. ज्या ऐकून तुम्हाला कदाचित तुमच्या डोळ्यासमोर या शिवराज्याभिषेक सोहळ्याची हलकीशी छटा निर्माण होईल.

शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी कित्येक महिने सुरु होती. या सोहळ्याच्या 9 दिवस आधी या राज्याभिषेकाशी संबंधित अनेक विधी पार पडले. 6 जून 1674 ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. यावेळी शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले, शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेली सोयराबाई दुसऱ्या मंचावर, तर बालसंभाजीराजे थोडेसे मागे बसले होते. अष्टप्रधानांतील]] आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर ते जलकुंभांनी शिवाजीमहाराजांबर अभिषेक केला. त्यावेळी मंत्रोच्चारण आणि आसमंतात विविध सुरवाद्य निनादत होते. सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर शिवाजी महाराजांनी लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले.गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली.मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.हेदेखील वाचा- Shivrajyabhishek Sohala Messages in Marathi: शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा, Wishes, Quotes द्वारे देऊन शिवछत्रपतींना करा त्रिवार मुजरा

राज्यभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार 32 शकुन चिन्हांनी सजवलेले होते. सभासदबखर म्हणते त्याप्रमाणे 32 मण सोन्याचे भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते.. शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. सोळा सवाष्णींनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. प्रजेनी महाराजानाआशीर्वाद दिला. ’शिवराज की जय’ शिवराज की जय’ च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीचे फुले उधळली गेली. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत 'शिवछत्रपती’ म्हणून उच्चार केला. राजे शिवाजी महाराजांनी सर्व जनांना खूप धन भेट म्हणून दिले. त्यांनी एकून सोळा प्रकारचे महादान केले. त्यानंतर विविध मंत्रिगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पदे, नियुक्तिपत्रे, धन, घोडे, हत्ती,रत्ने,वस्त्रे,शस्त्रे दान केली. हे सर्व सकाळी आठ वाजेपर्यंत संपले. समारंभ संपल्यावर, शिवाजी महाराज पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर दोन हत्तींवर जरीपटका आणि भगवा झेंडे घेऊन सेन्याचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुर, उधळले, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले.

राज्याभिषेकाचे परिणाम

राज्याभिषेकाच्या दिवसापासूनच स्वराज्यातील राजपत्रांवर ‘क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिवछत्रपती’ असे नमूद करणे सुरु झाले. शिवरायांनी राज्याभिषेकाच्या दिवसापासून नवीन शक सुरु केला आणि शिवराय शककर्ते राजे झाला आणि या शकाला ‘शिवराज्याभिषेक शक’ असे संबोधले जाते. शिवरायांनी आपल्या स्वतःच्या स्वराज्यात स्वतःच्या नावाची नाणी पाडली. तांब्याच्या पैश्याला ‘शिवराई’ व सोन्याच्या पैश्याला ‘शिवराई होन’ असे म्हटले जाऊ लागले. स्वराज्यात अधिकृतरीत्या शिवरायांनी अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली आणि अनेक सरदार व मंत्री यांना स्वराज्याची कामे व जबाबदाऱ्या वाटून दिल्या.