Savitribai Phule 188st Birth Anniversary: भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले यांची आज 188 वी जयंती. त्यांचे विचार, त्याची शिकवण ही नेहमीच सर्वांसाठी विशेषत: महिलांना प्रेरणा देणारी आहे. समाजातील रूढी, परंपरा बाजूला सारून, लोकांचा रोष पत्करून त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना साक्षर केले आणि पुढे जाऊन याच सावित्रीबाईंनी बुरसटलेल्या विचारांच्या लोकांमध्ये जाऊन अनेक महिलांना एकत्र करुन त्यांनाही साक्षर केले. स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने त्यांनी पुढे नेला.
अशा या हुशार, कतृत्ववान, जिद्दी सावित्रीबाईं फुले यांच्या जीवनाचे विविध पैलू मांडणारे '10' अनमोल गोष्टी
1. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी साता-यातील नायगावात झाला.
2. 1840 साली त्यांचा महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी विवाह झाला. त्यावेळी सावित्रीबाई 9 वर्षांच्या होत्या तर महात्मा ज्योतिराव फुले 13 वर्षांचे होते.
3. सावित्रीबाईं ना ख्रिश्चन मिशनर्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईं ना शिकवले.
4. समाजाचे बुरसटलेला विरोध झुगारुन 1 जानेवारी 1848 रोजी भिडेवाड्यात ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली.
5. सुरुवातील त्यांच्या शाळेत केवळ सहाच मुली होत्या तो आकडा वर्षाअखेरपर्यंत 40-45 वर जाऊन पोहोचला. यावर अनेक लोकांनी त्यांना विरोध केला, त्यांचावर शेण फेकले इतकच काय तर त्याच्या अंगावर हात टाकण्याची भाषा केली. मात्र त्या डगमगल्या नाही.
6. त्यांच्या या शिक्षणप्रसाराच्या ध्यासामुळे हा दाम्पत्यांना त्या दोघांना त्यांचे राहते घर सोडावे लागले होते. मात्र तरीही त्यांनी न डगमगता आपले कार्य सुरुच ठेवले.
7. अशा खडतर परिस्थितीत या दाम्पत्यांनी दोन शाळा काढल्या. त्यांचे हे शिक्षणकार्य पाहून 1952 मध्ये इंग्रज सरकारने फुले पतीपत्नीचा मेजर कँडी यांच्या हस्ते सत्कार केला.
8. केशवपन बंद करण्यासाठी व पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईं नी कल्पकतेने पार पाडली.
9. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.
10. त्यांच्या थोर सामजिक कार्याची कृतज्ञता म्हणून 1995 पासून 3 जानेवारी हा त्यांचा जन्मदिन “बालिका दिन” म्हणून साजरा केला जातो.
आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. आपल्या घरासाठी, स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. या सर्वांचे श्रेय हे फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुले यांच्या त्यागामुळे. अशा या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या 188 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.