नवरात्र उत्सवाच्या पूर्वी आता सप्तशृंगी गड (Saptashrung Gad) वाहतुकीसाठी बंद करून देखभालीची कामं केली जाणार आहेत. दरड प्रतिबंधक उपाय योजनेच्या कामासाठी 23 सप्टेंबर आणि 25 व 26 सप्टेंबर हे तीन दिवस सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत ( पाच तास ) नांदुरी ते सप्तशृंगी गड घाट रस्ता () वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यंदा शारदीय नवरात्र 3 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे त्या पार्श्वभूमीवर आता हे काम हाती घेतलं आहे. यामुळे भक्तांचा प्रवास सुकर आणि सुरक्षित होणार आहे.
सप्तश्रृंग निवासीनी देवीचा नवरात्र उत्सव हा घटस्थापनेपसून दसरा अर्थात 12 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. यासोबतच कोजागिरी पौर्णिमा दिवशी 16-17 ऑक्टोबर दरम्यानही कार्यक्रम होणार आहे. Shardiya Navratri 2024 Colours With Days: 3 ऑक्टोबर पासून सुरू होत शारदीय नवरात्री मध्ये यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग? पहा 10 दिवसांचे रंग .
सप्तश्रृंगी गडावर देखभालीच्या कामासाठी सहाय्यक अभियंता श्रेणी १. सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक ४ कळवण नाशिक यांनी 20 सप्टेंबरला सप्तश्रृंगी गड ते नांदुरी रस्त्यावर दरड प्रतिबंधक उपाययोजना अंतर्गत सुरु असलेलया कामाकरिता रस्ता बंद करण्याबाबतचे पत्र सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यावर कारवाई करत आता सहाय्यक जिल्हाधिकारी अकुनुरी नरेश यांनी सप्तश्रृंगीगड ते नांदुरी या रस्त्यावर दरड प्रतिबंधक उपाययोजना म्हणून जाळ्या बसवणे व बॅरियर बसविणे हे काम हाती घेतले आहे.
सप्तश्रृंगी देवी ही महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. आगामी शारदीय नवरात्र उत्सवादरम्यान देवीचं दर्शन भाविकांना 24 तास खुले राहणार आहे. नवरात्री निमित्त भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येत असतात. 100 एसटी बसेसच्या माध्यमातून नांदुरी ते सप्तशृंगी गड भाविकांची वाहतूक करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे.