724th Sant Dnyaneshwar Sanjeevan Samadhi Sohala: कोरोना संकटाचा प्रादुर्भाव यंदा सार्याच सणांवर पहायला मिळाला आहे. आषाढी पाठोपाठ कार्तिकी वारी (Kartiki Wari) मध्येही कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. दरवर्षी आळंदीतील कार्तिकी वारी साठी अनेक वारकरी मंडळी दाखल होत असतात. मात्र यावर्षी हा सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना आणि वारकरी मंडळींना करण्यात आले आहे. यंदाच्या 724 व्या संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याचं (Sant Dnyaneshwar Sanjeevan Samadhi Sohala) औचित्य साधत गर्दी टाळण्याचं आवाहन करत प्रशासनाने 6 डिसेंबरपासून आळंदी (Alandi) सोबतच आजूबाजुच्या 11 गावांमध्ये संचारबंदी (Curfew) लागू केली आहे. ही संचारबंदी 14 डिसेंबर पर्यंत लागू असेल. Curfew in Alandi: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदीत 6 ते 14 डिसेंबर दरम्यान संचारबंदी होणार लागू.
यंदा 8 डिसेंबरपासून आळंदी मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त व कार्तिकी यात्रा याचं औचित्य साधत साधेपणात सोहळ्याला सुरूवात झाली आहे. काल पंढरपूर मधून कार्तिकी वारीसाठी श्री पांडूरंग, संत नामदेवराय, संत पुंडलिकराय या मानाच्या तीन दिंड्या दाखल झाल्या आहेत. यामध्ये केवळ 20 वारकर्यांना आळंदीमध्ये प्रवेश दिला आहे. संचारबंदी लागू असलल्याने प्रशासनाने परवानगी दिलेल्या वारकर्यांव्यतिरिक्त अन्य भाविकांना बाहेरून आळंदी मध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
आळंदी मध्ये कार्तिकी कृष्ण अष्टमी ते अमावस्या असा कार्तिकी वारीचा सोहळा असतो. यामध्ये अष्टमीला हैबतराव बाबा पायरीचं पूजन करून सोहळ्याला सुरूवात होते. पुढे कार्तिकी कृष्ण एकादशी 11 डिसेंबरला साजरी होईल. त्यानंतर त्रयोदशी म्हणजेच 13 डिसेंबरला संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी उत्सव आहे. तर 14 डिसेंबरला त्याची समाप्ती आहे.
दरवर्षी लाखो भाविक कार्तिकी वारीसाठी आळंदी मध्ये दाखल होत असतात परंतू यंदा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हा सारा सोहळा रद्द करण्यात आला आहे. भाविकांना यंदा आषाढी प्रमाणे कार्तिकी वारी देखील गर्दी न करता साधेपणाने पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.